ऐतिहासिक महत्त्वाचे

सोलापूरला एक ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

सोलापूरचा इतिहास रोमांचक आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला. सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते. या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले. पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले. या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते. भारतातील (काही काळासाठी) स्वतंत्र झालेला असा हा पहिला भाग! मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ कायदा सोलापूरला लागू होता. या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले. या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते. पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन केसरी मध्ये आढळतात.
विशेष
थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्र्वर सोलापुरात होऊन गेले. सिद्धारामेश्र्वर यांनी सोलापूरला अडुसष्ट (६८) शिवलिंगांची स्थापना करून येथील धार्मिक माहात्म्य वाढवले. आपल्या शिष्यांसह एका सुंदर तळ्याची निर्मिती केली. याच तळ्याच्या मध्यभागी शिवमंदिर आहे व येथेच सिद्धरामेश्र्वर यांची शिवयोग समाधी आहे. तळ्याच्या मध्यभागी हे शिवमंदिर असल्याने देशातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे.

तेलुगू भाषिक असलेले संत शुभराय महाराज हे देखील सुमारे ३५ वर्षे सोलापुरात होते. तेलुगूसह मराठी, उर्दू, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. शुभराय यांनी अस्खलित मराठीत भक्तिपर पदे रचली आहेत. ही पदे आजही महाराष्ट्रात व कर्नाटकात गायली जातात. विनोबा भावेंच्या रोजच्या प्रार्थनेत शुभरायांचे पद होते. शुभराय हे थोर ईश्र्वरभक्त होते, कवी होते तसेच ते संगीत साधक होते व उच्चप्रतीचे चित्रकारही होते. त्यांनी रामायण व महाभारतावर आधारीत सुमारे ५०० चित्रे काढलेली आहेत. जमाखर्चाच्या कागदाच्या मागच्या बाजूवर काढलेली जलरंगातील चित्रे आश्चर्यकारक आहेत. २०० वर्षांनंतर आजही या चित्रांतील रंग ताजे वाटतात. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने ही चित्रे चित्रचिरंतन या पुस्तकातून प्रसिद्ध केली आहेत. या चित्रांची प्रदर्शनेही भरवली जातात.

कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी म्हणत भक्तीचा मळा फुलवणारे संत सावता माळी सोलापूर जिल्ह्यातलेच, संत चोखामेळा, कान्होपात्रा इथलेच आणि दुष्काळात बादशहाची धान्याची कोठारे लोकांना खुली करणारे संत दामाजीपंत याच जिल्ह्यातल्या मंगळवेढ्याचे. श्री स्वामी समर्थ या जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २१ वर्षे राहत होते. येथेच त्यांची समाधी आहे. आज अक्कलकोट हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थस्थान बनलेले आहे. लावणीकार शाहीर राम जोशीही याच जिल्ह्यातले. राम जोशी लावण्याही रचत तसेच कीर्तनेही करत. शुभराय महाराजांनी राम जोशी यांना उपदेश केल्यानंतर राम जोशी यांनी डफ फोडून टाकला व लावणी सोडली अशी कथा सोलापुरात प्रसिद्ध आहे. साहित्यसम्राट न.चि. केळकर यांचा जन्म जिल्ह्यातील मोडनिंब या गावी झाला, तर नवकवितेचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. युद्धकाळात रुग्ण सैनिकांची सेवा करून भारताचे नाव जगभर उज्ज्वल करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जन्मगाव सोलापूर असून, येथे त्यांचे स्मारकही आहे. तसेच पंचागकर्ते दातेही सोलपूरचेच.

साहित्यिकांचा विचार करता अठराव्या शतकातील शुभराय व राम जोशी यांचेनंतर विसाव्या शतकातील कवी कुंजविहारी (हरिहर गुरुनाथ सलगरकर) यांची नोंद निश्र्चितच घ्यावी लागेल. स्वातंत्रसंग्रामात त्यांच्या देशभक्तीपर कवितांनी जनतेला प्रेरणा दिली. तो शूरपणा आता रणात कसा नाही। इतिहास मराठ्यांचा स्मरणात कसा नाही।। अशा प्रखर कवितांसह सुंदर भावगीते लिहिणारे कवी संजीव (कृ. गं. दीक्षित) हेही सोलापूरचेच. प्रसिद्ध शाहीर अमर शेख; गीतकार रा. ना. पवार; ज्येष्ठ कादंबरीकार, कवी व समीक्षक त्र्यं. वि. सरदेशमुख; महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते डॉ. निर्मलकुमार फडकुले; संगीत तज्ज्ञ व कवी श्रीराम पुजारी; संत साहित्याचे अभ्यासक श्री. दा. का. थावर; ग्रामीण जीवन व लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ.द. ता. भोसले; सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक पंढरपूरचे श्री. वा. ना. उत्पात; समीक्षक डॉ. गो. मा. पवार अशा अनेक दिग्गजांनी आपल्या अभ्यासाच्या व कलेच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्याच्या लौकिकात भर घातली आहे.प्रख्यात चित्रकार एम.एफ. हुसेन व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातलेच. अक्करमाशी या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक प्रा. निशिकांत ठकार, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली हेही याच जिल्ह्यातले.

क्रीडाक्षेत्राचा विचार करता दिवंगत क्रिकेटपटू पॉली उम्रीगर यांचा उल्लेख करता येईल. पॉली उम्रीगर यांच्या कारकिर्दीची सुरुवात सोलापुरात झाली पुढे ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले. नुकतीच (२००८ मध्ये) कु. अनघा देशपांडे हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. कु. अनघाने नुकत्याच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.

 


solapur pune pravasi sangatana