कोल्हापूर ते हरिद्वार, डेहराडून रेल्वेची मागणी

23/07/2012 13:32
खानापूर - कोल्हापूरच्या महालक्ष्मीहून थेट पवित्र स्थान हरिद्वारहून डेहराडून येथे जाण्यासाठी थेट रेल्वेची मागणी पश्‍चिम महाराष्ट्रातील जवान व गलई बांधवांनी केली आहे. ब्रॉडगेज झालेल्या पंढरपूर मार्गामुळे या मागणीला जोर आला आहे.

सांगली जिल्हा गलई व्यवसायासाठी देशात प्रसिद्ध आहे. लष्करात जिल्ह्यातील जवानांची संख्याही कमालीची आहे. अनेक गलई बांधव देशाच्या कानाकोपऱ्यात स्थायिकदेखील झालेत. मात्र जवानांना व गलई बांधवांना जन्मभूमीत येण्यासाठी अतोनात कष्ट घ्यावे लागत आहेत. आरक्षित जागा मिळण्यासाठी तीन महिन्यांपासून प्रयत्न करावे लागतात. वेळेत येण्यासाठी दलालांमार्फत भरमसाट रक्‍कम मोजावी लागते आहे. गावाकडे येण्यासाठी थेट गाडी नसल्याने प्रतीक्षा करून रेल्वे रात्री-अपरात्री परराज्यात बदलावी लागते.

जवान, गलई बांधवांना जन्मभूमीकडे येणे कष्टप्रद वाटू लागले आहे. पर्याय म्हणून उत्तर भारतात गंगा नदीच्या काठी हरिद्वार येथे जाण्यासाठी तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेहहराडूनला जाण्यासाठी थेट रेल्वे मिरज, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंडमार्गे सुरू करण्याची मागणी आहे.
उत्तर भारतातील सर्व ठिकाणी जाणे या नव्या मार्गावरील रेल्वेने सोयीचे होणार आहे. धार्मिक लोकांना अनेक पवित्र ठिकाणे कमी वेळेत पाहण्यास जाण्याची संधी मिळणार आहे

solapur pune pravasi sangatana