मालगाडीवर एक्स्प्रेस आदळून २४ ठार, ४० जखमी

23/05/2012 10:17
पी.टी.आय., पेनुकोंडा(आंध्र प्रदेश), बुधवार, २३ मे २०१२
अनंतपूर जिल्ह्य़ातील पेनुकोंडा येथे आज पहाटे बंगलोर येथे जाणाऱ्या ‘हम्पी एक्स्प्रेस’च्या इंजिनाची मालगाडीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात २४ जण ठार तर अन्य ४० जण जखमी झाले. ‘हम्पी एक्स्प्रेस’च्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष करून तशीच गाडी पळविल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आज पहाटे सव्वातीनच्या सुमारास झालेल्या या अपघाताची तीव्रता एवढी जबरदस्त होती की प्रथम गाडीचे चार डबे रुळावरून खाली घसरले आणि त्यापैकी एका डब्याला आग लागली. याच डब्यातील १६ जणांचा जळून मृत्यू झाला आणि त्यामध्ये महिलांची संख्या मोठी होती, असे अनंतपूर विभागाच्या पोलीस उपसंचालक चारु सिन्हा यांनी सांगितले. या अपघातात २४ जण मरण पावले असून जखमी झालेल्या ४० प्रवाशांना पेनुकोंडा, हिंदुपूर आणि अनंतपूर येथील रुग्णालयांमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
या अपघातात बळी गेलेले बहुतेक सर्वजण मजूर होते आणि होस्पेट व हुबळीहून ते बंगलोर येथे जात होते, असे सिन्हा यांनी  सांगितले. ‘हम्पी एक्स्प्रेस’च्या चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केले असावे, असा अंदाज रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी व्यक्त केला. सदर चालक आणि त्याचा सहाय्यक या अपघातात जखमी झाला असून या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. मात्र हे दोघेही सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे सांगण्यात आले. रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले.
मृतांच्या नजिकच्या नातेवाईकांना पाच लाख, गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना एक लाख तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत रेल्वेमंत्र्यांनी या वेळी जाहीर केली.
या अपघातानंतर धर्मावरम् येथून मदतकार्य करणारी रेल्वेगाडी तसेच वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. हा अपघात घडल्यामुळे काहीकाळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र बाजूचा रेल्वेमार्ग मोकळा करण्यात आला असून या भागातील बहुतेक रेल्वे वाहतूक आता पूर्ववत झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेतर्फे बंगळुरू,  बेल्लारी, हॉस्पेट शहरांमध्ये हेल्पलाईन कार्यन्वित करण्यात आली आहे.
बंगळुरू शहरातील हेल्पलाईन क्रमांक - ०८०-२२३२११६६, २२१५६५५३, २२१५६५५४; बेल्लारी - ०८३९२-२७७७०४; हॉस्पेट - ०८३९४-२२१७८८; हुबळी - ०८३६-२३४५३३८, २३४६१४१, २२८९८२६ 

solapur pune pravasi sangatana