रेल्वे गुडसमधील सुविधांसाठी उद्यापासून माल उचलणे बंद

24/07/2012 13:30
कोल्हापूर - मार्केट यार्ड येथील रेल्वे गुडसमधील सोयीसुविधा तातडीने पुरविल्या नाहीत, तर 25 जुलैपासून माल उचलणे बंद करून रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा आज हमालांच्या संघटनांनी प्रभारी जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांना दिला. त्यामुळे धुळाज यांनी विभागीय रेल्वे अभियंत्यांशी संपर्क साधून चर्चा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर त्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि अभियंत्यांना नोटिसा पाठविल्या.

हमालांच्या बंदमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास रेल्वे प्रशासनास जबाबदार ठरेल, असा संदर्भ त्यांनी नोटिशीत दिला. हमालांसह त्यांच्या संघटांनाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली.

सध्या मार्केट यार्डमधील रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे, चार प्लॅटफॉर्मवर साडेतीनशे हमाल काम करतात, प्लॅटफॉर्म ते गोदाम रस्त्यावर चिखल आहे, रेल्वे ट्रॅकवरील पाण्याचा निचरा होत नाही, गटर्सची सोय नाही, अशा विविध मागण्यांसाठी गेली वर्षभर हमाल संघटना प्रशासनाशी चर्चा करून प्रश्‍न सोडविण्याची मागणी करतात. मात्र, तरीही याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे 25 जुलैपासून कामबंद आंदोलन करून रेल्वे रोको करणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावेळी श्री. धुळाज यांनी सर्व कागदपत्रे आणि आजपर्यंतचा पाठपुरवा पाहिला. तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठवून प्रत्यक्षात पाहणी केली तेव्हा तेथे फारच वाईट स्थिती आहे. हमालांना चालणेही मुश्‍किल आहे. त्यांच्या पायांना जखमा झाल्यास लेप्टोस्पायरेसीससारखे आजार होण्याची शक्‍यता आहे. तसेच त्यांनी बंद पुकारला, तर सिमेंट, खत, धान्य यांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक होते. गुडसच्या कामासाठी खासदार मंडलिक यांनी 25 लाख रुपये देण्याचे जाहीर करूनही रेल्वे प्रशासन काहीच काम करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तातडीने सुविधा करण्यासाठी श्री. धुळाज यांनी रेल्वे प्रशासनाची चर्चा केली. मात्र त्यालाही चार-पाच महिन्यांचा कालावधी जाणार असल्यामुळे हा प्रश्‍न चिघळण्याची शक्‍यता वाढली. म्हणूनच श्री. धुळाज यांनी नोटिसा पाठविल्या.

हमालांच्या शिष्टमंडळात महाराष्ट्र ट्रान्स्पोर्ट अँड वर्कस युनियनचे अध्यक्ष सी.बी.पाटील, हमाल पंचायतीचे महादेव शेलार यांच्यासह हमाल उपस्थित होते. माथाडी मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सहायक कामगार आयुक्त बाळासाहेब गुजरही यावेळी उपस्थित होते.

solapur pune pravasi sangatana