रेल्वे तिकिट आरक्षणही प्रीपेड

30/08/2012 16:45
मुंबई, दि. ३० - रेल्वेचे तिकिट आरक्षित करणे ऑनलाइन व्यवस्थेमुळे आता अगदी सोपे झालेले असतानाच, रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ अर्थात आयआरसीटीसीने आरक्षण यापेक्षाही अधिक सुलभ करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रोलिंग डिपॉझिट स्कीम अर्थात आरडीएस नावाची नवी योजना त्यासाठी राबवण्यात येणार असून त्या माध्यमातून तिकिट आरक्षण अधिक सोपे होईल, असे आयआरसीटीसीचे जनसंपर्क विभागाचे सह महाव्यवस्थापक प्रदीप कुंडू यांनी सांगितले.
या योजनेत प्रवासी त्याच्या आरडीएस खात्यात आधीपासूनच काही रक्कम जमा ठेवू शकतो. आरक्षणाच्या वेळी ही रक्कम वापरली जाईल. या योजनेसाठी सुरुवातीला नोंदणी शुल्क म्हणून २०० ते २५० रुपये खर्च येईल. त्यानंतर किमान १५०० ते दोन हजार रुपयांची जमा या खात्यात ठेवावी लागेल. तिकिट आरक्षित होताच, या खात्यातून रक्कम आपोआप वळती होईल. आपल्या नेहमीच्या बँक खात्यातून आरडीएस खात्यात नेहमीच्या पद्धतींनी रक्कम जमा केली जाऊ शकते.

solapur pune pravasi sangatana