रेल्वे मालधक्का माथाडींचे काम बंद आंदोलन सुरू

26/07/2012 13:27
कोल्हापूर - रेल्वे गुडस्‌मध्ये सोयी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी रेल्वे माल धक्का माथाडी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले. रेल्वे व्यवस्थापनाशी आज सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही, त्यामुळे माल चढ-उताराचे काम ठप्प झाले. मागण्या मान्य न झाल्यास पॅसेंजर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

रेल्वे गुडस्‌ परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचते. तेथे मोठ्या प्रमाणात दलदल होते. मालाची चढ-उतार करण्यासाठी भक्कम पर्यायही नाहीत. त्यामुळे गुडस्‌मध्ये माथाडींना काम करणेही मुश्‍कील होते. अशात माथाडी कामगार पाय घसरून पडला, तर तातडीने उपचार मिळत नाही. असे अपघात होण्याची शक्‍यताही वाढली आहे. त्यामुळे रेल्वे व्यवस्थापनाने येथे माथाडी कामगारांसाठी सुविधा पुरावाव्यात. जेणेकरून सुरक्षितरीत्या रेल्वे वॅगनमधील मालाची चढ-उतार चांगल्या प्रकारे करता येईल, अशी अपेक्षा गुडस्‌ कामगारांची आहे.

आज सकाळपासून पावसाने रिपरिप सुरू केल्याने आजही रेल्वे गुडस्‌ परिसरात चिखल झाला. यात माल भरण्यासाठी सात-आठ ट्रक थांबून होते. हीच स्थिती मार्केट यार्डातील वेअर हाऊस येथेही असते. आज दोन्ही ठिकाणी माथाडींनी काम बंद केल्याने गाड्यामध्ये माल भरला गेला नाही.

पावसाचा जोर कायम असल्यामुळे काही मोजक्‍या माथाडी कामगारांनी काम केले. बहुतेकांनी काम केलेच नाही. त्यामुळे मालाचा उठाव झाला नाही. माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने रेल्वे व्यवस्थापनाची भेट घेतली. यात रेल्वे अधिकारी डीओएम थॉमस येथे आले. त्यांनीही या परिसराची फिरून पाहणी केली. यानंतर माथाडी संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चाही केली. या वेळी गुडस्‌ परिसरात रस्ते दुरुस्त करावेत, पिण्याच्या पाण्याची सोय करावी, स्वच्छतागृह उभे करावे, प्लॅट फॉर्मवर कव्हर शेड करावे, फ्लॅटफॉर्मवर पत्रे बदूलन द्यावेत, रेल्वे गुडस्‌ येथे ड्रेनेजची सोय करावी, प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी, माथाडी कामगारांना विश्रांती शेड तयार करून द्यावे, कामाच्या ठिकाणी पुरेशी लाईटची व्यवस्था करावी अशा मागण्या केल्या. अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सायंकाळी 4 वाजेपर्यंत सकारात्मक तोडगा निघाला नाही.

या वेळी सी. बी. पाटील, कृष्णात चौगुले, महादेव भोसले, मुकादम शिंदे, गोरख लेंडवे, अल्लावदीन शेख आदींनी आंदोलन केले.

solapur pune pravasi sangatana