समस्यांच्या गर्दीतून "जयसिंगपूर एक्‍स्प्रेस' सुसाट!

30/07/2013 15:42
जयसिंगपूर- रेल्वेच्या उत्पन्नाचा आलेख सातत्याने चढता राखणाऱ्या जयसिंगपूर रेल्वे स्थानकातील गैरसोयींकडे प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने समस्यांच्या गर्दीतून सुसाट धावणाऱ्या "जयसिंगपूर एक्‍स्प्रेस'ला आता प्रशासनाने ब्रेक लावावा, अशी मागणी प्रवाशांमधून होऊ लागली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात काही पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

जयसिंगपूर रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून समस्या आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवर आली तरीही तिकिटांसाठी प्रवाशांच्या रांगा लागलेल्या असतात. एकाच खिडकीतून तिकिटांची व्यवस्था असल्याने आणखी एक खिडकी सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रेल्वे स्थानकावर येतानाही खराब रस्त्यांचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असून पाण्याच्या डबक्‍याच्या दोन्ही बाजूंनी प्रवाशांना मार्ग काढावा लागत आहे.

स्थानकावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पैकी एकाच ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी एखाद्या बाटलीत पाणीदेखील भरता येत नाही, अशी अवस्था आहे. यामुळे स्थानकावर विकत घेतलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या सर्वत्र दिसून येतात.

नवीन इमारतीखालील रिकाम्या जागेचा वापर मुतारीसाठी केला जात आहे. तिकिटासाठी जातानाच प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतागृहांची पुरेशी देखभाल न ठेवल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. शिवाय, उड्डाणपुलाचा काही भाग गंजून खराब होऊ लागला आहे. याची वेळीच डागडुजी करणे आवश्‍यक आहे.

प्रवाशांची संख्या लक्षात घेता दोन ठिकाणी तिकीट खिडक्‍यांची व्यवस्था करावी, सर्वच ठिकाणच्या नळांना पाणी उपलब्ध करुन द्यावे, स्टेशनसमोरील रस्ते डांबरीकरण करावेत, स्टेशनवरील कचऱ्याचे निराकरण करावे, पुरेशी बैठक व्यवस्था असावी, पैसे, दागिने चोरीच्या घटना टाळण्यासाठी स्टेशनवर पुरेसे संरक्षण असावे, अशा मागण्या प्रवाशांमधून केल्या जात आहेत.

solapur pune pravasi sangatana