"सिद्धेश्‍वर'च्या वातानुकूलित डब्यांचा अडसर

16/09/2011 14:58
सोलापूर -  मध्य रेल्वे विभागाच्या सोलापूर-मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांचा पूर्वनियोजित क्रम अचानक बदलण्यात आल्याने द्वितीय श्रेणी प्रवासी संभ्रमात पडले आहेत. याबाबतचे निवेदन सोलापुर पुणे प्रवासी संघटनाचे सचिव महावीर शहा यांनी दिले आहे.

पूर्वी सिद्धेश्‍वर एक्‍स्प्रेसला डब्यांचे क्रम सुयोग्य पद्धतीने होते. इंजिनलगत जनरल डबा, नंतर वातानुकूलित आणि त्यानंतर द्वितीय श्रेणीचे सलग असे एस 1 ते एस 11 या क्रमांकाचे डबे असत. मात्र, आता हा क्रम अचानक बदलण्यात आला. आता वातानुकूलित डबे मध्येच लागतात. प्रथम जनरलचे डबे, त्यानंतर द्वितीयश्रेणी एस 1 ते एस 5 चे डबे, यानंतर वातानुकुलितचे तीन डबे यानंतर एस 6 ते एस 11 या क्रमाने डबे लावण्यात येतात. वातानुकूलित डब्याचे मधले दरवाजे पूर्ण बंद असतात. यामुळे द्वितीय श्रेणी आरक्षित डब्यांचा एकसंधपणा तुटला जातो. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना डबे बदलता येत नाहीत. कोणत्यातरी स्टेशनावर गाडी थांबली तर त्यावेळी जड सामान घेऊन पळत पळत तीन डबे ओलांडणे शक्‍यच होत नाही. कधी कधी दरवाजे उघडे असले तरी त्या डब्यातील तिकीट तपासणीस लगेच अडवतात. "सिद्धेश्‍वर'च्या डब्यांची स्थिती अचानक का बदलली याचा उलगडा होत नसल्याने संघटनेने वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. श्री. गायकवाड यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

solapur pune pravasi sangatana