अखेर कोकण रेल्वे रुळावर

20/06/2011 11:39

सर्वप्रथम ‘कोकणकन्या’ मडगावकडे रवाना

रत्नागिरी - गुरुवारपासून ठप्प झालेली कोकण रेल्वे आता पोमेंडीच्या रुळावरून धावू लागली आहे. पोमेंडीत संरक्षक भिंतीसह दरड कोसळल्याने तीन दिवस कोकण रेल्वेला सक्तीने मेगाब्लॉक घ्यावा लागला होता.
पोमेंडी येथील दोन रेल्वे बोगद्यांच्या मध्ये असलेल्या या रेल्वेमार्गावर गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंत तुटून डोंगर दरडीचा काही भाग रुळांवर घसरला होता. त्यामुळे अनेक गाडय़ा रद्द कराव्या लागल्या होत्या.
या घटनेनंतर कोकण रेल्वेने तत्काळ मार्ग मोकळा करण्यास प्रारंभ केला होता. शंभरावर कामगार व आठ जेसीबींच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम करीत मार्ग मोकळा करण्यात आला. आज (रविवार) सकाळी 8.45 वाजता सर्वप्रथम या मार्गावरून रत्नागिरीतून कोकणकन्या मडगावकडे रवाना झाली. त्यानंतर जनशताब्दी, मंगला एक्स्प्रेस मडगावकडे रवाना झाल्या. दुपारी सव्वादोन वाजता मुंबईकडे पहिली गाडी मंगला एक्स्प्रेस रवाना झाली.
पावसाचे आभार
ज्या वेगाने गेल्या चार दिवसांपूर्वी जिल्ह्याला मुसळधार पावसाने तडाखा दिला, तो वेग गेल्या तीन दिवसांपासून ओसरला. शनिवार व रविवारी तर अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळेच पोमेंडी येथील दरड उपसा करणे व मार्ग मोकळा करणे शक्य झाले. पावसाचे प्रमाण वाढले असते तर कोकण रेल्वेपुढील ‘मुसीबत’ अजून वाढली असती.


solapur pune pravasi sangatana