इंजिन बंद पडल्याने हरिप्रिया दोन तास ठप्प

03/03/2012 10:04
मिरज - कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्‍स्प्रेस (क्रमांक 27416) आज मध्येच बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दोन तास ती रुळावरच खोळंबली होती. यादरम्यान मिरज-बेळगाव मार्गावरील अन्य गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या.

रेल्वेच्या प्रवासात इंजिन मध्येच बंद पडण्याचा प्रकार अपवादानेच घडतो. हरिप्रियाच्या प्रवाशांनी तो आज अनुभवला. दुपारी सव्वा एक वाजता ती कोल्हापुरातून मिरजेत आली. दहा मिनिटांच्या थांब्यानंतर पुढील प्रवासाला निघाली. यादरम्यान इंजिन सुस्थितीत होते. स्थानकापासून अवघा एक किलोमीटर प्रवास केल्यानंतर म्हैसाळ रेल्वे उड्डाण पुलाखाली जाऊन ती थांबली. सिग्नल मिळाला नसेल किंवा कोणीतरी आडवे आले असेल या शंकेने प्रवाशांनी गाडी परत सुरू होण्याची काही वेळ प्रतीक्षा केली; मात्र अर्धा तास झाला तरी ती हालण्याची चिन्हे दिसेनात. त्यामुळे चालकाकडे चौकशी केली असता इंजिन बंद पडल्याचे उत्तर मिळाले.

मुख्य चालक आणि त्याचा सहायक इंजिन सुरू करण्यासाठी तासभर धडपडत होते; मात्र स्टार्टरच लागत नव्हता. अखेर बेळगाव स्थानकात तसा संदेश देण्यात आला. मिरज स्थानकात इंजिन शिल्लक होते; मात्र गाडीची दिशा बेळगावकडे असल्याने मिरजेतील इंजिन त्याला नेऊन जोडणे शक्‍य नव्हते. शेडबाळ स्थानकात एक मालगाडी सिग्नल मिळण्याच्या प्रतीक्षेत होती. तिला तेथेच थांबवण्यात आले. तिचे इंजिन काढून हरिप्रियाला आणून जोडण्यात आले. त्यानंतर बंद पडलेल्या इंजिनासह एक्‍स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली. हुबळीपर्यंत ती दोन इंजिनांसह गेली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दोन तास प्रवासी मध्येच अडकून पडले होते.

यादरम्यान मिरज ते बळगाव या मार्गावरील अन्य प्रवासी व मालगाड्या ठिकठिकाणी रोखून धरण्यात आल्या. एकेरी मार्ग असल्याने हरिप्रिया बाजूला झाल्याशिवाय अन्य गाड्या सोडणे शक्‍य नव्हते. कोल्हापूर-बंगळूर राणी चन्नम्मा एक्‍स्प्रेस अंशतः उशिरा धावली.

solapur pune pravasi sangatana