ऊस आंदोलनामुळे रेल्वे फुल्ल

18/11/2012 13:26
कोल्हापूर - ऊसदर आंदोलनाची धग आजही कायम असल्याने सांगली, मिरज, सोलापूर मार्गावरील बस वाहतूक अद्यापही तुरळक सुरू आहे. परिणामी प्रवाशांना रेल्वेचाच आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज-सोलापूर मार्गावरील प्रवासासाठी रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी केली.

आठ दिवसांपासून ऊसदराबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यात सांगली, कोल्हापूर, सोलापूर या मार्गावर एसटी गाड्यांवर दगडफेक झाली तर सोमवारी झालेल्या आंदोलनात महामार्गावर एसटी बस पेटवून दिली. त्यामुळे एसटीच्या सर्वच मार्गावरील फेऱ्या बंद केल्या. ही वाहतूक दोन दिवसांपासून सुरू आहे. तरीही मार्गावर एखाद्या ठिकाणी आंदोलक अचानक रास्ता रोको करण्याची शक्‍यता असल्याने परिस्थिती बघूनच गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर-सोलापूर मार्गावरील एसटी गाड्याच्या वेळेच नियोजन काहीसे विस्कळित झाले आहे.

परिणामी अनेक प्रवाशांनी रेल्वेला पसंती दिली. त्यामुळे रेल्वेला तीन दिवसांपासून गर्दी होत आहे. दिवसांतून दोन ते तीन गाड्या सोलापूरला जातात. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद लाभला आहे. ही रेल्वे मिरजेत गेल्यानंतर मिरजेतून पुढे सोलापूरला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी आहे. त्यामुळे प्रवाशांना कोल्हापूर-सांगली मार्गावर तुडुंब गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.

गेल्या चार दिवसांत रेल्वेच्या महसुलातही दिवसाला 30 ते 60 हजारांची वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे पोलिसांनीही रेल्वे मार्गावर गस्त सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना वरील मार्गावर सुरक्षित प्रवास करता येत आहे.

ठराविक मार्ग संवेदनशील
जिल्ह्यात बांबवडे, गारगोटी, कुरुंदवाड, दानवाड मार्ग व सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका, आष्टा, भिलवडी या मार्गावरील तणाव असल्याने अनेक ठिकाणी रास्ता रोको होऊ शकतो. ही बाब एसटी

महामंडळाने विचारात घेतली आहे. त्यामुळे येथील मार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूक होत आहे. दिवाळीची सुटी संपल्यानंतर अनेक जण नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी परतत आहेत. त्यामुळे बसस्थानाकावर गर्दी होत आहे. अशात एखादी गाडी वेळेत आली तर ठीक, अन्यथा रेल्वे अथवा खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेऊन पुढील प्रवास केला जात आहे. त्यामुळे रेल्वेबरोबर खासगी प्रवासी वाहतूकदारांनी तिकीट दरात तीस-चाळीस रुपये वाढ केली. काही मोजक्‍या वाहतूकदारांनी भाड्यात कोणतीही वाढ न करता प्रवाशांची वाहतूक केल्याचे सांगण्यात येते.

solapur pune pravasi sangatana