एक्सप्रेसमध्ये तरुणास लुटले

12/11/2011 12:23
सोलापूर। दि. 10 (प्रतिनिधी)
नागरकोयल व हैदराबाद एक्सप्रेसमध्ये दरोडय़ाची घटना ताजी असतानाच यशवंतपूर एक्सप्रेसमध्येही तरुणास लुटल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
अहमद महेबूब मोमीन (वय 19, रा. गुलबर्गा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात 11 तरुणांविरूद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोमीन व त्यांचे मित्र 8 नोव्हेंबर रोजी सोलापूर—यशवंत एक्सप्रेसमधून प्रवास करीत होते. रेल्वे डब्यात व सोलापूर रेल्वे प्लॉटफॉर्मवर उतरल्यावर 11 तरुणांनी मोमीन व त्यांच्या मित्रास मारहाण करून अर्धा तोळय़ाची सोनसाखळी, एक मोबाईल हँडसेट, रोकड असा सुमारे 15 हजाराचा ऐवज लुटून नेला. जाताना तरुणांनी केलेल्या दगडफेकीत मोमीन जखमी झाले. प्लॉटफॉर्मवर घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये धावपळ उडाली. मोमीन यांनी घडल्याप्रकाराबाबत फिर्याद दाखल केली. प्लॉटफॉर्म सदर बझार पोलीस ठाण्यात हद्दीत असल्याने गुन्हा वर्ग करण्यात आला. पुढील तपास फौजदार माने करीत आहेत. नागरकोईल व हैदराबाद एक्सप्रेसवर दरोडा पडला. प्रवाशांनी रेलरोको केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला व दोन प्रवाशांवरच कारवाई केली. यामुळे दरोडय़ाबाबत तक्रार न देताच प्रवासी निघून गेले. ही घटना ताजी असतानाच यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये असाच प्रकार घडला.

solapur pune pravasi sangatana