एसटीला विठ्ठल पावलाच नाही

22/07/2011 15:57

 

मिरज - एसटीला यंदाच्या आषाढीला पंढरीचा विठ्ठल पावलाच नाही. मिरज-पंढरपूर ब्रॉडगेजवर रेल्वेने भरभरून वारकऱ्यांची वाहतूक केल्याने त्याचा थेट फटका एसटीला बसला. गतवर्षीच्या तुलनेत मिरज आगाराचे उत्पन्न थेट पन्नास टक्‍क्‍यांवर आले.

रेल्वे सुरू झाल्याने एसटीला फटका बसेल अशी भीती होती. तथापि, आषाढी यात्रा तोंडावर आली तरी रेल्वेने जादा गाड्यांचे नियोजन केले नव्हते; त्यामुळे एसटीला उत्पन्नाची आशा होती. पहिल्या टप्प्यात सहा जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. मात्र, रेल्वेने ऐनवेळी तब्बल चौदा जादा फेऱ्या सोडल्या. त्याशिवाय नियमित धावणाऱ्या सहा गाड्या आणि कोल्हापूर-नागपूर या द्विसाप्ताहिकी एक्‍स्प्रेसनाही प्रचंड गर्दी झाली. त्याचा परिणाम म्हणून एसटीची प्रवासी संख्या रोडावली.

गतवर्षी मिरज आगाराने आषाढीसाठी जादा गाड्या सोडून 53 हजार किलोमीटर प्रवासी वाहतूक केली. याद्वारे यात्रेतून दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा फक्त 29 हजार किलोमीटर गाड्या धावल्या. त्यातून अवघे 6 लाख 36 हजारांचे उत्पन्न मिळाले. केविलवाणी बाब म्हणजे यातील बहुतांशी उत्पन्न हे मिरज-पंढरपूर मार्गावरचे नाही. मिरजेतून पंढरपुरात गेलेल्या गाड्यांनी मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहून तिकडे फेऱ्या केल्या. त्यातूनच मिरज आगाराला उत्पन्न मिळवता आले. त्यामुळे यंदाच्या आषाढीला मिरज आगाराला विठ्ठल पावलाच नाही. पंढरपूरला जाण्यासाठी 91 रुपये घेणाऱ्या एसटी ऐवजी 21 रुपयांत विठ्ठलदर्शन घडवणारी देवाची गाडीच वारकऱ्यांना अखेर भावली..


solapur pune pravasi sangatana