ऐरोली-ठाणे मार्गावर लोकल घसरली

10/02/2013 13:08
मुंबई/ठाणे।
दि. ९ (प्रतिनिधी)
पनवेल-ठाणे मार्गावर ऐरोली स्थानकादरम्यान आज सायंकाळी ४ वाजता लोकलचे चार डबे घसरून ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णत: ठप्प झाली.
ठाण्याकडे अपच्या दिशेने येणार्‍या या लोकलचे एक सोडून एक असे चार डबे घसरल्याने नेमका हा अपघात का व कसा झाला याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर तातडीच्या तत्त्वावर अप-डाऊनची लोकल सेवा बंद करण्यात आल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
रेल्वे प्रशासनाने टीएमटी, एनएमएमटी व बेस्टकडे विशेष बसेस सोडण्याची मागणी केली. त्या सेवा उपलब्ध झाल्याने अनेकांची सोय झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने
केला आहे. बाधित डबे हे संध्याकाळी ७.४0 च्या सुमारास रेल्वेट्रॅकवर आणण्यात आले. ती लोकल रात्री ८.१५ च्या सुमारास कारशेडच्या दिशेने रवाना करण्यात आली. या मार्गावरील रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम हाती घेण्यात आले. रात्री आठ वाजेदरम्यान वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी ए.के. सिंग यांनी दिली. आजच्या या गोंधळामुळे एकूण ४२ लोकल फेर्‍या रद्द कराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले.

solapur pune pravasi sangatana