कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे नवी मुंबईत उपोषण

19/05/2011 17:30

नवी मुंबई, दि. १८  - भूमिपुत्रांना नोकर्‍या द्या या मागणीसाठी कोकणातील प्रकल्पग्रस्तांनी आज कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. मात्र भूमिपुत्रांच्या या आंदोलनाची साधी दखलही रेल्वे प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
कोकण रेल्वे मार्गासाठी जमिनीचे भूसंपादन करताना रेल्वे प्रशासनाने स्थानिक भूमिपुत्रांना अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र नंतर त्या सर्वच आश्‍वासनांना हरताळ फासला. भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांची नोकरभरती केली. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. सदर भरती प्रक्रियेला भूमिपुत्रांनी कडाडून विरोध केला आहे. भूमिपुत्रांना तातडीने नोकरी द्या, या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने आज रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयासमोर ४५ प्रकल्पग्रस्तांनी लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणकर्त्यांमध्ये समितीचे अध्यक्ष व्ही. सी. शिंदे, संतोष चव्हाण, गणेश सुर्वे, आकांक्षा मयेकर, सुषमा गावडे, विनायक सकपाळ, महेंद्र डोंगरे आदी सहभागी झाले होते.
एकही अधिकारी फिरकला नाही
कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांनी बेलापूर येथील मुख्यालयासमोर आज उन्हातान्हात लाक्षणिक उपोषण छेडले. मात्र या उपोषणाकडे कोकण रेल्वेचा एकही वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही. शेवटी सायंकाळी उपोषणकर्त्यांना आपले निवेदन कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍याकडे द्यावे लागले.


solapur pune pravasi sangatana