कोकण रेल्वेच्या रुळांवर कर्मचारी जखमी

09/08/2011 16:06

संगमेश्वर, ६ ऑगस्ट
कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वेस्थानक ते करबुडेदरम्यान येणाऱ्या वांद्री उक्षी येथील बोगद्यात पहाटेच्या वेळी ट्रॅकवर गस्त घालणारा कर्मचारी पॅसेंजर रेल्वेखाली सापडून गंभीर जखमी होण्याची घटना  घडली. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दयानंद सदाशिव पवार (३६, रा. धामणी, ता. संगमेश्वर) हे कोकण रेल्वेच्या संगमेश्वर ते करबुडेपर्यंतच्या मार्गावर गस्त घालण्यासाठी कार्यरत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने मार्गावर कोणताही अडथळा येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांची गस्त कायम ठेवण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे काल रात्री ते आज सकाळपर्यंत पवार यांची पाळी सुरू होती. यामध्ये पहाटे ते वांद्री उक्षी बोगद्याजवळून गस्त घालत होते. ट्रॅकजवळूनच गस्त घालत असतानाच सकाळी रत्नागिरी स्थानकावरून सुटलेल्या रत्नागिरी-दादर पॅसेंजरच्या येण्याचा अंदाज न आल्याने पवार हे ट्रॅकवरच अडकले. सुदैवाने त्यांच्या जिवाचे केवळ पायावर निभावले. रेल्वे पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. याची खबर लाइनमनने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात दिल्यावर पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. संगमेश्वरात प्रथमोपचार करून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने अधिक उपचारासाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


solapur pune pravasi sangatana