कोल्हापूर-कुर्डूवाडी एक्‍स्प्रेस रेल्वे सुरू

04/11/2011 14:51
कोल्हापूर - पंढरपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोयीची ठरणाऱ्या कोल्हापूर-कुर्डूवाडी एक्‍स्प्रेस रेल्वेला आजपासून सुरवात झाली. अनेक वर्षांपासून रेल्वे पॅसेंजर असोसिएशनतर्फे ही रेल्वे सुरू करण्याची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रवासीवर्गाची सोय झाली असून आज पहिल्या दिवशी गाडीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

येथील छत्रपती शाहू महाराज रेल्वे टर्मिनसवरून ही दररोज सायंकाळी सव्वासहा वाजता सोडण्यात येणार आहे. ही गाडी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी कुर्डूवाडी येथे पोचणार आहे. कुर्डवाडी येथून पहाटे साडेतीन वाजता ही रेल्वे निघेल. ती कोल्हापुरात सकाळी साडेदहा वाजता पोचणार आहे.

ही गाडी कोल्हापूर, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर, गोडलिंब, कुर्डूवाडी अशी धावणार आहे. या गाडीमुळे पंढरपूर-सांगोला परिसरातील लोकांना नियमित प्रवास करता येणे शक्‍य झाले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान, रेल्वे पॅसेंजर असोसिएशन कोल्हापूर-हैदराबाद ही रेल्वे व्हाया मिरज, पंढरपूर, सोलापूर, हैदराबाद, विशाखापट्टणम यामार्गे सोडावी, तसेच पुणे स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या पुणे-जोधपूर व पुणे-जम्मू या दोन्ही गाड्या कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून सोडण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र रेल रोड पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णराव सोळंकी व शिवनाथ बियानी यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचीही सोय
कोल्हापूर शहरात मिरज, पंढरपूर, सांगोला या परिसरातून भाजीपाला, फळभाज्या तसेच डाळिंब, पेरू, सीताफळ अशा प्रकारचा शेतीमाल येथे येतो. त्यांच्या सौद्यासाठी शेतकरी येथे येतात; तर काही व्यापारी किराणा बाजारपेठेत घाऊक खरेदीसाठी येतात. या व्यावसायिकांना रेल्वेची सोय झाली आहे. त्यामुळे बाजापेठेतील उलाढाल वाढीसाठी ही रेल्वे उपयोगी होणार असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. बांधकाम क्षेत्रातही काम करणारे मजूर व पंढरपूर भागातून येतात, त्यांनाही गाडी सोयीची ठरणार आहे.

solapur pune pravasi sangatana