ठाणे ते कुर्ला दरम्यान कामायनी एक्स्प्रेसमध्ये वृद्धेची हत्या

02/05/2011 13:04

मुंबई १ मे
वाराणसीहून लोकमान्य टिळक टर्मिनसला येणाऱ्या कामायनी एक्स्प्रेसमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नानकिलाल मोहंमद सिद्दिकी असे मयत महिलेचे नाव असून त्या ६५ वर्षांच्या होत्या. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात हा मृतदेह आढळून आला असून ठाणे ते कुर्ला दरम्यान ही हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या सिद्दिकी नातवाच्या लग्नासाठी मुंबईला येत होत्या. मयत सिद्दिकी यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केल्याच्या खूणा दिसून आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्दिकी आणि त्यांचा नातू इम्रान हे मुंबईला येण्यासाठी शुक्रवारी अलाहाबाद येथे गाडीत बसले. इम्रान हा आजीबरोबरच महिलांच्या डब्यातून प्रवास करत होता. ही गाडी ठाणे रेल्वे स्थानकात आली असता एक अज्ञात व्यक्ती महिलांच्या डब्यात शिरली आणि तीने इम्रानला हा महिलांसाठी राखीव डबा असल्याने दुसऱ्या डब्यात जायला सांगितले. त्याप्रमाणे इम्रान दुसऱ्या डब्यात जाऊन बसला.दरम्यान गाडी सुटल्यानंतर ठाणे ते कुर्ला रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सिद्दिकी यांची त्या अज्ञात व्यक्तीकडून हत्या करण्यात आली असावी असा पोलिसांना संशय आहे. सिद्दिकी यांच्या जवळील २ हजार ५०० रुपये गायब झाले आहेत. कामायनी एक्स्प्रेस कुर्ला टर्मिनस येथे पोहोचल्यानंतर इम्रान आजीला घेण्यासाठी महिलांच्या डब्यात गेला असता त्याला आजी मृतावस्थेत आढळून आली. इम्रानने केलेल्या वर्णनानुसार त्या अज्ञात व्यक्तीचे रेखाचित्र तयार करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली.


solapur pune pravasi sangatana