ठाण्याचा लोकल प्रवास असुरक्षितच

20/06/2011 11:56

कळवा कारशेडमधून ठाणे स्थानकात आलेल्या लोकलच्या डब्यात सलग दुस-या दिवशी मृतदेह आढळल्याने रविवारी एकच खळबळ उडाली.

ठाणे-लोकलवरील दगडफेकीत प्रवासी जखमी होण्याच्या घटनांत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. त्यात शुक्रवारी रात्री कळवा कारशेडमध्ये तरुणीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह टाकण्यात आल्याचे उघड झाल्याने पोलिसांची भंबेरी उडाली आहे.
 झोपडपट्टीला लागून असलेले कळवा कारशेड गैरकृत्यांचा अड्डा मानला जात असला तरी, या कारशेडच्या सुरक्षेची जबाबदारी अवघ्या चार सुरक्षारक्षकांच्या शिरावर असल्याने अपप्रवृत्तींना वाढत असल्याचा सूर ठाणेकरांत उमटत आहे. रात्रीच्या वेळी कळवा कारशेडमध्ये लोकल गेल्यावर झोपेत असलेल्या एकटय़ा-दुकटय़ा प्रवाशाला लुटण्याच्या अनेक घटनाही येथे घडल्या आहेत. येथील यार्ड मास्तरांकडे तशा अनेक तक्रारी आल्या आहेत. कारशेड परिसर मोठाल असून, त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षाबलाकडे आहे. मात्र, या दोन्ही यंत्रणा चिरीमिरीपायी अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांतून होत आहे. कळव्यातील मफतलाल कंपनीजवळ मोठी झोपडपट्टी असून तिथे राहणारे गुंड गैरकृत्यांसाठी कारशेडचा वापर करत असल्याचे बोलले जाते. याच मंडळीकडून चालत्या लोकलवर दगड मारणे, काठीने लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांवर हल्ले केले जात असल्याचेही  पुढे येत आहे. दरम्यान, कळवा कारशेडचे ठिकाण निर्मनुष्य असल्याचे सांगून पोलिस जबाबदारी झटकत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी मार्गावरील काही ठिकाणी दिवस-रात्र पोलिस तैनात ठेवण्यात येतील, परिसरात अतिरिक्त गस्त वाढवण्यात येणार असल्याचे लोहमार्ग पोलिस उपायुक्तांनी म्हटले होते. मात्र त्यानंतरही या परिसरात पोलिसांची गस्त वाढली नसल्याने कळवा कारशेडसह कळवा ते मुंब्रा दरम्यानचा परिसर असुरक्षितच आहे.  

प्रवाशांवरील हल्ला झाल्याच्या घटना
 
सुनील भीमराव बनसोडे (45) याचा रविवार 19 जून रोजी ठाणे रेल्वे स्थानकात गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह.

कळवा-मुंब्रा प्रवासादरम्यान जयश्री त्रिभुवन (24) या महिलेवर रात्रीच्या वेळी रॉडने हल्ला.

31 मे रोजी ठाण्याहून कल्याणकडे जाणा-या महिलेवर कळवा परिसरात हल्ला.

 आठवडाभरापूर्वी कळवा-मुंब्रा दरम्यान दगड भिरकावल्याने संतोष लोखंडे (40) हे प्रवासी जखमी.


solapur pune pravasi sangatana