नागपूर एक्‍स्प्रेसचा मिरजेत मुक्काम 30 तास

23/11/2012 13:21
मिरज - कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेसला मिरजेत तब्बल तीस तासांचा मुक्काम देण्यात येत आहे. या कालावधीत ही गाडी कोल्हापूर-पुणे एक्‍स्प्रेस म्हणून सोडावी, अशी मागणी आहे. गाडी आणि कर्मचारी उपलब्ध असतानाही सक्तीचा मुक्काम दिल्याने नुकसान होत आहे.

नागपूर-कोल्हापूर एक्‍स्प्रेस परतल्यानंतर गाडी मिरजेत आणली जाते. तेथे ती तब्बल तीस तास थांबवून ठेवण्यात येते. दीड दिवसांच्या मुक्कामानंतर ती पुन्हा नागपूरला रवाना होते. ही गाडी पुण्याला सोडल्यास प्रवाशांची सोय होईल. रेल्वेलाही चांगले उत्पन्न मिळेल. दिल्लीत सध्या रेल्वे अर्थसंकल्पाच्या हालचाली सुरू आहेत. कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेस गाडीच्या या बदलासाठीही पाठपुरावा आवश्‍यक आहे.

कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस (सोमवार व शुक्रवार) (01403) दुपारी 12.50 ला निघते. दुसऱ्या दिवशी दुपारी 12.35 ला नागपुरात पोहोचते. नागपूर-कोल्हापूर (01404) प्रत्येक मंगळवारी व शनिवारी दुपारी तीन वाजता निघते व दुसऱ्या दिवशी दुपारी 3.25 ला कोल्हापुरात पोहोचते. नागपूरहून बुधवारी दुपारी परत आलेली गाडी कोल्हापुरात थांबवता येत नाही. पुरेसे ट्रॅक उपलब्ध नसल्याने मिरजेत आणली जाते. कोल्हापूर-मिरज पन्नास किलोमीटरचे अंतर ती रिकामीच धावते. गुरुवारी दिवसभर व शुक्रवारचा अर्धा दिवस अशा तीस तासांच्या मिरजेतील मुक्कामानंतर शुक्रवारी पुन्हा या गाडीला कोल्हापूरला रिकामे नेले जाते. तेथून दुपारी ती नागपूरला प्रयाण करते. पंढरपूर-सोलापूरमार्गे धावणाऱ्या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद आहे. मिरजेत तीस तास थांबवण्याऐवजी या गाडीला कोल्हापूर-पुणे फेरी वाढवण्याची मागणी आहे.

सोय आणि उत्पन्नही
ही गाडी कोल्हापुरातून पहाटे चारच्या सुमारास सोडल्यास ती पुण्यात अकरा-बारापर्यंत पोहोचेल. संध्याकाळी सहानंतर पुण्यातून परत सोडल्यास ती रात्री कोल्हापुरात येऊ शकेल. एका दिवसात पुण्याला जाऊन येण्याने प्रवाशांची सोय होईल.

solapur pune pravasi sangatana