नागरसोईल एक्स्प्रेसवर दरोडा

05/11/2011 10:35
सोलापूर। दि. ४ (प्रतिनिधी)
मुंबई-नागरसोईल एक्स्प्रेस मलिकपेठ व वाकाव (मोहोळ) दरम्यान क्रॉसिंगसाठी थांबल्यानंतर दरोडेखोरांनी चार डब्यांमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटल्याची घटना घडली. पोलीस बंदोबस्त नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी सोलापूर रेल्वेस्थानकावर उशीरापर्यंत रेल्वे रोखून धरली होती. मुंबईतील व्यापारी जाफर अली हे जखमी झाल्याचे वृत्त आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे विभागाने कुडरूवाडी रेल्वे स्थानकावर कोणतीही गाडी तूर्त न थांबविता सोलापूरकडे रवाना करावी असा आदेश दिला आहे. सोलापूर रेल्वेस्थानकावर रोखण्यात आलेली गाडी कन्याकुमारीकडे रवाना करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. गाडी रोखणार्‍या तिघा प्रवाशांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईहून दुपारी १२ वाजता कन्याकुमारीकडे नागरसोईल एक्स्प्रेस (क्र.१६३३९) निघाली होती. कुडरूवाडी रेल्वेस्थानकावर ७ वा. थांबा घेऊन पुढे मार्गस्थ झाल्यानंतर वाकाव-मलिकपेठ(मोहोळ) या स्थानकावर रेल्वेला मार्ग देण्यासाठी क्रॉसिंगसाठी ७.३0 वाजण्याच्या सुमारास थांबलेली होती. सुमारे अर्धातास गाडी थांबल्याने दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक धाकवून डब्यांमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने लुटले. प्रवाशांनी विरोध करताच दगड व चाकूने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.
घटनास्थळापासून सोलापूरकडे रेल्वे निघाली असताना संतप्त झालेल्या प्रवाशांनी पाच-सहा वेळा गाडीची चेन ओढून गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. सोलापूर रेल्वेस्थानकावर ८.३0 वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोहोचली. रेल्वेतील प्रवाशांनी डब्यात बंदोबस्तासाठी पुरेसा पोलीस फोर्स नसल्याने सुमारे दोन तास गाडी रोखून धरली.
रेल्वे पोलिसांनी प्रवाशांवर लाठीहल्ला व बळाचा वापर करून १0.५0 वाजता रेल्वे कन्याकुमारीकडे रवाना केली. रेल्वे रोखणार्‍या दोघा प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

solapur pune pravasi sangatana