निजामुद्दीन एक्‍स्प्रेसच्या जनरल बोगीत आग

19/01/2012 15:32
मिरज - गोवा-निजामुद्दीन एक्‍स्प्रेसच्या जनरल बोगीमध्ये काल रात्री आग लागली. कर्मचाऱ्यांनी पंधरा मिनिटांत ती आटोक्‍यात आणली. या प्रकाराने रेल्वे सुटण्यास अर्धा तास उशीर झाला.

गोव्याहून निजामुद्दीनला निघालेली एक्‍स्प्रेस (क्रमांक 12779) रात्री साडेदहा वाजता मिरजेत आली. गाडीला येथे दहा मिनिटांचा थांबा आहे. रेल्वे पोलिस ठाण्याच्या समोरील बाजूला शेवटचे जनरल डबे आणि गार्डचा डबा होता. गाडी थांबल्यानंतर यातील एका जनरल बोगीतून धूर येऊ लागला. आग लागली, असा आरडाओरडा करीत प्रवाशांनी बोगीतून उड्या मारल्या. पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. बोगीत एका आसनाजवळ आग लागल्याचे त्यांना दिसून आले. अज्ञात प्रवाशाने पेटती सिगारेट आसनावरच टाकली होती व त्यामुळे त्याने पेट घेतला होता. शेजारच्या आसनाजवळही धग पोहोचली होती.

कर्मचाऱ्यांनी रुळालगतच्याच पाईपमधून बोगीत पाण्याचा मारा केला; त्यामुळे आग आटोक्‍यात आली. यादरम्यान, रेल्वे बोगी पेटल्याचे वृत्त स्थानकात पसरल्याने गोंधळ माजला. अवघ्या पंधरा मिनिटांत आग विझली. या घटनेने निजामुद्दीन एक्‍स्प्रेस अर्धा तास उशिराने दिल्लीकडे रवाना झाली.

solapur pune pravasi sangatana