निधीअभावी सोलापूर विभागातील रेल्वेची विकासकामे रखडल्याची कबुली ! प्रवाशांच्या सुरक्षेबाबत महाप्रबंधकांनी हात झटकले !

05/02/2012 14:27

सोलापूर।
दि. 4 (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेतील सोलापूर विभागात विविध ठिकाणी वारंवार पडणारे रेल्वेवरील दरोडे, प्रवाशांना लुटण्याचे वाढलेले प्रकार, दगडफेकीचे प्रकार याबाबत, प्रवाशांना सुरक्षा देण्याबाबत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी पोलिसांची संख्या कमी आहे, देशभरात अनेक ठिकाणी अशा घटना रेल्वेबाबत घडतात, असे सांगून अक्षरश: हात झटकले. तसेच मनपा व जि. प. च्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कोणतीही सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

    कुडरूवाडी-लातूर यादरम्यान झालेल्या रेल्वे ब्रॉडगेजची तसेच नवीन स्टेशनची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी दुपारी महाप्रबंधक एस. के. जैन यांनी दौरा केल्यानंतर सोलापूर येथील डॉ. कोटणीस हॉस्पिटलमधील सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. मिरज- लातूर यादरम्यान ब्रॉडगेज झाल्यानंतर सध्या ताशी 70 कि़मी़ने वेग करण्यात येत आहे. या मार्गावर ताशी 120 कि़मी़ वेगाने गाडय़ा चालू शकतात, याची यशस्वी चाचणी झालेली आहे. प्रवासी वाहतूक ताशी 100 कि़मी़ लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासाची वेळ कमी होणार आहे.
होटगीजवळ इलेक्ट्रिक लोको शेड उभारण्याऐवजी दौंड येथे उभारण्यात येणार असल्याची चर्चा आहे, असे विचारले असता महाप्रबंधक जैन म्हणाले की, रेल्वे बोर्डाच्या वतीने तीन अधिका:यांची कमिटी नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय होणार आहे. सोलापुरातील पिटलाईन, जंबो साईडिंग गुडस् शेड आदींच्या कामाबाबत निधीची कमतरता आहे. निधीशिवाय कामे करता येत नसल्याचे जैन यांनी सांगितले. सिध्देश्वर एक्स्प्रेस व इंद्रायणी एक्स्प्रेसमधील बोगी वाढविण्याबाबत अडचणी आहेत. पुणे स्टेशनवर वाहतुकीच्या गर्दीमुळे इंद्रायणीचे शुटिंग होऊ शकणार नाही, असेही जैन यांनी सांगितले. यावेळी मध्य रेल्वेचे सीएओ एम. के. गुप्ता, डीआरएम ए. के. प्रसाद, सीपआरओ व्ही. ए. मालेगावकर, एजीएम ङोड ए. सिद्दीकी, पीसीई पी. के. सक्सेना, सीसीएम एस. व्ही. इंगळे, वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड आदी उपस्थित होते.
जनरल बोगीसाठी ‘क्यू ईन’ सिस्टीम
सिध्देश्वर एक्स्प्रेससह अनेक गाडय़ात जनरल बोगीत सीट पकडून विक्री करण्याचे प्रकार घडत असल्याबाबत विचारले असता, महाप्रबंधक जैन यांनी अशा घटना रोखण्यासाठी ‘क्यु-ईन’ सिस्टीमचा वापर तातडीने करण्याचे आदेश सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांना दिले. नागपूर व पुणे येथेही अशाच प्रकारे ‘क्यु-ईन’ सिस्टीमचा वापर केल्याने गैरप्रकार थांबल्याचेही एक. के. जैन यांनी सांगितले.


solapur pune pravasi sangatana