पंढरपुरातून नियमित रेल्वेगाडी सुरू व्हावी

09/11/2011 13:54

पंढरपूर - पंढरपूर-कुर्डुवाडी ही ब्रॉडगेज सेवा सुरू होऊन जवळपास दहा वर्षे होत आली, तरी देखील अजूनपर्यंत पंढरपूरसाठी रेल्वे प्रशासनाने नियमित एकही गाडी सुरू केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात पंढरपूरसाठी काही ठोस निर्णय रेल्वेमंत्र्यांनी घ्यावेत, अशी अपेक्षा येथील रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुरेश लाड यांनी व्यक्त केली.

या पूर्वीच्या काही खासदार मंडळींनी या प्रश्‍नाला फारसे गांभीर्याने न घेतल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून पंढरपूर-कुर्डुवाडी ब्रॉडगेज सेवा सुरू होऊन देखील या भागात फारसे रेल्वेचे जाळे कार्यान्वित होऊ शकलेले नाही, याबद्दल लाड यांनी खेद व्यक्त केला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यांनी येत्या अर्थसंकल्पात पंढरपूरसाठी काही नियमित गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांकडे आग्रह धरावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पंढरपूरपासून कुर्डुवाडीपर्यंत सकाळी सहाला एक गाडी येथून सध्या सुरू आहे. त्या गाडीला आणखीन पाच डबे जोडून ही गाडी थेट पुण्यापर्यंत फास्ट पॅसेंजर म्हणून सुरू करावी. त्यामुळे पंढरपुरातून बसलेला नागरिक सकाळी दहा वाजता पुण्यास पोचून आपली सर्व कामे करू शकतो. पुण्याहून पंढरपूरला येण्यासाठी संध्याकाळी गाडी ठेवल्यास तेथून बसणारा प्रवासी सायंकाळी साडेअकरा पर्यंत येथे पोचू शकतो. ही गाडी सुरू झाली तर येथून जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांच्या वेळात या रेल्वे मार्गावर अन्य कोणतीही गाडी नसते. त्यामुळे या गाडीला मार्गावर कोठेही अडथळा येत नाही ही बाब विशेष महत्त्वाची आहे. रेल्वेच्या तत्कालीन सरव्यवस्थापक राजलक्ष्मी यांनी या प्रस्तावास अनुमती देऊन लवकरात लवकर ही गाडी सुरू करण्यासाठी आश्‍वासन दिले होते. मात्र, त्या नंतर त्यांची बदली झाल्यामुळे ही गाडी अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. या नियमित गाड्या सुरू केल्यास पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, माढा, बार्शी आणि करमाळा या सात तालुक्‍यांतील नागरिकांना याचा फायदा होईल. पंढरपूर-पुणे ही एक गाडी सुरू केली तर या गाडीला प्रवाशांची कायम गर्दी राहील. या गाडीला प्रतिसाद मिळेल, लातूर मार्ग सुरू होऊन जवळपास एक वर्ष होत आले तरीपण या मार्गावर सध्या एकही गाडी नाही. त्यामुळे त्याचा देखील विचार या अर्थसंकल्पात केला जावा, अशी मागणी येथील नागरिकांतून सध्या जोर धरीत आहे.


solapur pune pravasi sangatana