पंढरपूर-लोणंद आणि मिरज रेल्वेमार्गासाठी खास तरतूद करण्याची राज्यसभेत मागणी

09/11/2011 13:55
नवी दिल्ली, (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील पंढरपूर-लोणंद, पंढरपूर-मिरज आदि रेल्वे मार्गांसाठी खास तरतूद करून रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील आपल्या बांधवांना रक्षाबंधनाची अपूर्व भेट द्यावी असे भावनिक आवाहन राज्यसभेचे युवा खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी शुक्रवारी राज्यसभेत केले. रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी या मागणीस तात्काळ मंजुरी देवून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
राज्यसभेत रेल्वे अनुदान विधेयकाच्या चर्चेत भाग घेताना खा. मोहिते-पाटील यांनी महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांचा प्रश्न उचलून धरला. या मार्गासंबंधात मागणी करताना मोहिते-पाटील यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांना "सर्वजण तुम्हांला दीदी याच नावाने बोलावतात. मी आपला छोटा भाऊ आहे. चार दिवसांवर रक्षाबंधन आहे. या राष्ट्रीय सणाचे औचित्य साधुन मी तुमच्याकडे भेट मागत आहे, असे भावनिक आवाहन करुन महाराष्ट्रातील पंढरपूर-लोणंद, पंढरपूर-मिरज तसेच कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथील रेल्वे कारखान्यासंदर्भातील मागण्या त्यांनी मांडल्या.
खा. मोहिते-पाटील पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून पंढरपूर-लोणंद या रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे. या मार्गासाठी ब्रिटिश काळात आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर मात्र देश स्वतंत्र होवून 64 वर्षे झाली तरीही या मार्गाचे साधे सर्वेक्षणही झाले नाही. हा मार्ग झाला तर या भागातील शेती माल इतर बाजारपेठेत पाठविण्यासाठी शेतकरी व कारखानदार यांच्या दृष्टीने सोईचे होणार आहे. या मार्गाचा त्वरित सर्वे करून रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू करावे. पंढरपूर-मिरज या रेल्वे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. वर्षभरात सुमारे सव्वा ते दोन कोटी भाविक पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या निमित्ताने येतात. त्याचबरोबर इतर प्रवाशांसाठीही हा मार्ग सोईचा आहे. या मार्गावरील रेल्वे स्टेशन, कार्गोहब तसेच प्रवासी सुविधांसाठी अपुरा निधी आहे. त्यामुळे या कामास गती देण्यासाठी 800 कोटी रुपये मंजूर करावेत अशीही मागणी खा. मोहिते पाटील यांनी केली.
कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखान्यासंदर्भात बोलताना खा. मोहिते-पाटील म्हणाले, ब्रिटिश काळात सन 1930 मध्ये पंढरपूर-लातूर ही नॅरोगेज रेल्वे बार्शी लाईट कंपनी म्हणून चालविली जात होती. कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखान्यात नॅरोगेजचे डबे व इंजिन तयार केले जात होते व त्याची दुरुस्ती केली जात होती. हा कारखाना बंद झाल्याने तेथील हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कारखान्यासाठी 30.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याचे टेंडरही काढण्यात आले होते परंतु नंतर ते रद्द करण्यात आले. या कामासाठी पुन्हा 30 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी खा. मोहिते-पाटील यांनी केली.

solapur pune pravasi sangatana