पीटलाइनसह प्लॅटफॉर्म एकचे विस्तारीकरण रखडले...

16/09/2011 15:08
सोलापूर - सोलापूर रेल्वे स्थानकातील अनेक विकासकामे मंजूर असली तरी केवळ निधीअभावी फाईलीत बंद आहेत.

सोलापूरहून सुटणाऱ्या गाड्या 24 डब्यांच्या असाव्यात यासाठी किमान 24 डब्यांची मेंटेनन्स लाइन (पिट लाइन) उभी करावी लागते. सध्या सोलापुरात जुनी 18 डब्यांची पिट लाइन आहे. नवी पिटलाइन निधीअभावी अर्धवट अवस्थेत आहे. या कामाचे महत्त्व म्हणजे या नव्या 24 डब्यांच्या पिटलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतरच सिद्धेश्‍वरला डबे वाढू शकतात. सध्या नाईलाजाने 18 डब्यांची सिद्धेश्‍वर सोडावी लागते. सिद्धेश्‍वरच्या डब्यांची संख्या वाढली तर प्रवाशांची मोठी सोय होईल. यासाठी तातडीने निधी उपलब्धतेसाठी पाठपुरावा करणे व विविध प्रकल्प आणणे गरजेचे आहे. याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या विस्तारीकरणाला केवळ मंजुरी मिळाली आहे, मात्र निधी उपलब्ध नाही. सध्या या प्लॅटफॉर्मवर केवळ 18 डब्यांची गाडी उभी राहू शकते. ही क्षमता 24 डब्यांची करण्यासाठी हे विस्तारीकरण गरजेचे आहे. सिद्धेश्‍वर गाडी 21 डब्यांची करावयाची असली तरी सर्वप्रथम या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण अपेक्षित असल्याचे मत रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी व्यक्त केले.

सोलापूर रेल्वेच्या विविध प्रलंबित कामांबाबत खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी गत महिन्यातच विभागीय रेल्वेच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती. यात वरील कामे निधीअभावी पूर्ण होत नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय सोलापूर स्थानक आदर्श स्थानकांच्या यादीत असावे, भिगवण ते मोहोळ हे सोलापूर विभागातील दुहेरीकरण व इलेक्‍ट्रिफिकेशन पूर्ण व्हावे, यासाठी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून रेल्वेमंत्रालयाकडे सततचा पाठपुरावा सुरू आहे. ही कामेही लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा आहे. एकूणच सोलापूरच्या विभागीय रेल्वेच्या विकासाची गाडी धावायची असेल तर निधीरुपी इंधन उपलब्ध करणेही गरजेचे आहे.

solapur pune pravasi sangatana