मध्य रेल्वे बसवणार 'एलईडी' सिग्नल

23/06/2012 13:12
मुंबई - रेल्वेमार्गालगतच्या सिग्नलच्या खांबाची धडक बसून नाहूर स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी तीन प्रवाशांचा बळी गेला होता. या दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेने सिग्नलच्या खांबावरील "प्लॅटफॉर्म' (मचाण) काढून अत्याधुनिक "एलईडी' सिग्नल लावण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी ही माहिती दिली.

सिग्नलची दुरुस्ती-देखभाल करताना रेल्वे कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी खांबाला मचाण बसवण्यात येते. प्रवाशांनी भरून सीएसटीकडे येणाऱ्या लोकलच्या दरवाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहूर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान एका सिग्नल खांबावरील प्लॅटफॉर्मचा धक्का लागल्यामुळे तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. कुर्ला येथे सिग्नल पॅनल जळाल्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा दोन दिवस खेळखंडोबा झाला होता. त्याच काळात ही दुर्घटना घडल्याने रेल्वे प्रशासनावर सडकून टीका झाली होती. सिग्नलच्या खांबावरील लोखंडी मचाण तुटून रेल्वेमार्गाकडे झुकल्यामुळेच ती दुर्घटना घडली होती.

मध्य रेल्वेने उपनगरी मार्गावरील सर्व सिग्नल खांबांवरील मचाण काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सिग्नलजवळ "एलईडी' सिग्नल बसवले जाणार आहेत. सिग्नलचा खांब रेल्वेमार्गापासून 2.4 मीटर अंतरावर असतो. लोकल कितीही वेगात असली, तरी दारात लटकणारे प्रवासी 10 इंचांपेक्षा जास्त बाहेर येणार नाहीत, याची काळजी घेतलेली असते. प्रवासी खिडक्‍यांना लोंबकळत असतील, तर मात्र खांबांची धडक बसू शकते, असे जैन यांनी सांगितले. सिग्नलच्या खांबाला वा त्यावरील मचाणावर प्रवासी आदळून पुन्हा दुर्घटना होऊ नये, यासाठी "एलईडी' सिग्नल बसवण्यात येतील.

एक किमी अंतरात किमान पाच सिग्नल असतात. ज्या ठिकाणी अशा दुर्घटनांची शक्‍यता वाटते, तेथील सिग्नल सुरुवातीला बदलले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सिग्नल "एलईडी' केले जातील, अशी माहिती जैन यांनी दिली.

solapur pune pravasi sangatana