मरिन लाइन्सजवळ ओव्हरहेड वायर तुटून पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे हाल

06/02/2012 15:57
प्रतिनिधी , मुंबई
altसोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मरिन लाइन्सजवळ ओव्हरहेड वायरमध्ये कावळा अडकल्याने ही वायर तुटून लोकल वाहतुकीचा बोऱ्या वाजला. काही गाडय़ा रद्द झाल्याने आणि वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू असल्याने सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे मार्गावरील हजारो प्रवाशांचे अतोनात हाल झाले. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कार्यालय गाठण्यासाठी निघालेल्या नोकरदारांना वेळेत पोहोचता आले नाही.
ओव्हरहेड वायरमध्ये कावळा अडकून शॉर्टसर्किट झाल्याने ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आणि लोकल अर्धा तास उशिराने धावू लागल्या. शिवाय सकाळी साडेसात ते १० या ऐन गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वेच्या १३ लोकल गाडय़ा रद्द झाल्या. त्यामुळे चर्चगेटकडे येणाऱ्या प्रवाशांची ठिकठिकाणी रेल्वेस्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली.  ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम दोन तासांत झाले पण  पश्चिम रेल्वेची लोकलसेवा दुपारी उशिरापर्यंत सुरळीत झाली नव्हती. ओव्हरहेड वायर तुटली तेथे जवळच कावळय़ाचे अवशेष सापडले. त्यामुळे कावळा अडकून शॉर्टसर्किट झाले आणि ही वायर तुटल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.      

 


solapur pune pravasi sangatana