महापालिका, रेल्वेच्या वादात 'पुलाचे' रुंदीकरण रखडले

25/04/2011 14:10

सोलापूर - विजापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले, पण रेल्वे पुलाचे काम महपालिका आणि रेल्वेच्या वादात रखडले आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने कालच रेल्वे खात्याला पुन्हा स्मरणपत्र पाठविले असून महापौर थेट रेल्वेमंत्र्याला उद्या पत्र पाठविणार आहेत.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे पुणे-सोलापूर, पुणे-हैदराबाद रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. तर सोलापूर ते विजापूर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम राज्य शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे करण्यात येत आहे. सोलापूर- हैदराबाद रस्त्याच्या कामाला गती आली आहे. पण विजापूर रस्त्यावरचे काम पूर्ण होऊनही कंबर तलावाजवळील रेल्वेपुलाच्या रुंदीकरणाअभावी ते रखडले आहे. तेथे वाहतुकीची मोठी कोंडीतर होत आहेच पण अपघाताला वाव निर्माण झाला आहे.

महापालिका हद्दीत असल्याने शहरातील आसरा पूल, विजापूर रस्ता(कंबर तलाव) पूल व भय्या चौक (देगाव रस्ता) या तिन्ही पुलाची जबाबदारी महापालिकेवर आहे. मात्र रेल्वेसाठी हे पूल बांधले गेल्याने महापालिकेने या पुलांचे काम रेल्वेने करावे असा प्रयत्न चालविला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या संदर्भातील पत्रव्यवहार होत आहे. पण प्रत्यक्षात काहीच निर्णय होत नसल्याचे दिसते आहे. सध्याचे तिन्ही पूल 18 मीटर (60 फूट) इतके रुंद करावेत असा प्रस्ताव आहे. तसे इस्टिमेटही तयार आहे. त्यासाठीचा निधी रेल्वे मंत्रालयाने द्यावा म्हणून काल (बुधवारी) महापालिकेने रेल्वे विभागाला पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. तर उद्या महापौर आरिफ शेख हे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पत्र पाठविणार आहेत.

याबाबत महापालिकेचे नगरअभियंता सुभाष सावसकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, रेल्वेपुलाच्या रुंदीकरणासाठी आम्ही निधी देत नाही' असे उत्तर रेल्वे मंत्रालयाने दिले आहे. रेल्वेपुलाच्या कामासाठी मोठा निधी लागणार आहे. तेवढा खर्च करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने या कामासाठी निधी दिला पाहिजे असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी रेल्वेच्या डीआरएम यांच्यासोबत बैठकाही झाल्या आहेत. मात्र याबाबत लवकरच निर्णय होऊन हे काम सुरू होईल.

उदासिनता आणि असमन्वय
या संदर्भात आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे चौकशी केली असता हे काम राज्य सरकार करीत असल्याचे व्यवस्थापक आर. सी. मेहता यांनी सांगितले. तर राज्य सरकारच्या महामार्ग विभागाचे उपअभियंता मोरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी महापालिका आणि रेल्वे विभागाकडे बोट केले. त्यामुळे एकूणच या रस्त्याच्या कामाबाबत शासन पातळीवर किती उदासिनता आणि दुर्लक्षितपणा आहे याची प्रचिती येते. रस्त्याचे काम करणारे हे विभाग किती समन्वयाने वागतात हेही लक्षात आले.


solapur pune pravasi sangatana