महाराष्ट्राच्या हातात उपेक्षेचे तिकीट !

01/03/2012 16:54
केंद्राच्या अखत्यारीतील रेल्वे खात्याने महाराष्ट्राच्या हाती नेहमीच उपेक्षेचे तिकीट टेकवले. भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या मुंबई, पुण्यापासून ते देशाचे मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या नागपूरपर्यंत; रेल्वेने कोणत्याच शहराला "फर्स्ट क्‍लास' दर्जाचे काम केलेले नाही. महाराष्ट्राची ही उपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात तरी थांबावी, अशी माफक अपेक्षा आहे.मुंबई - लोकलचा भार वाढतोय
उपनगरी रेल्वेसाठी स्थापन झालेल्या "मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन'ने सन 2014 चा विचार करून "एमयूटीपी'चे तीन टप्पे आखले. या प्रकल्पात जागतिक बॅंक, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा आर्थिक सहभाग आहे. यातील पहिल्या टप्प्यालाच सोळा वर्षे लागली. दुसरा टप्पा आता कोठे सुरू झाला. तिसरा अजून कागदावरच आहे. उपनगरी गाड्यांचे डबे वाढले. मात्र, प्रचंड गर्दीसमोर ही वाढ तुटपुंजी आहे. मध्य रेल्वेवर 15 डब्यांच्या गाड्यांसाठी फलाट, लांबपल्याच्या गाड्यांसाठी कुर्ला आणि छत्रपती शिवाजी स्थानकांमध्ये पाचवा व सहावा मार्ग, हार्बर मार्गावर बारा डब्यांच्या गाड्या, जलद उपनगरी सेवेसाठी स्वतंत्र मार्गिका, पनवेल-अलिबाग लोकल या मुंबईकरांच्या "विशलिस्ट'मधील प्रकल्प केवळ चर्चा व अर्थसंकल्पातील घोषणांपुरतेच आहेत.

कोकण - नेहमीची परवड
कोकण रेल्वे महामंडळाला स्वतंत्र गाड्या चालविण्याचे अधिकार नाहीत. कोकणासाठी मध्य रेल्वे दोन -चार गाड्या चालवते. पावसाळ्यात ही रेल्वे बेभरवशी ठरते. रेल्वे बोर्डाने अद्याप कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला पूर्णत- मंजुरी दिलेली नाही. दुपदरीकरण टप्प्याटप्प्याने होणार असल्याने किमान दहा वर्ष दुपदरीकरण होण्याची शक्‍यता नाही. सध्या मध्य रेल्वेने पनवेल-पेण, पेण-रोहा मार्गावर दुपदरीकरण हाती घेतले आहे. कोल्हापूर-कोकण रेल्वे मार्गाने जोडण्याची घोषणा झाली, मात्र त्याचे सर्वेक्षण झालेले नाही.

जळगाव - हॉर्टिकल्चर ट्रेन
भुसावळ जंक्‍शनमधून दररोज दीडशेपेक्षा अधिक गाड्या देशाच्या चारही दिशांना जातात. तीनशे कोटींपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या भुसावळ विभागात भुसावळहून मुंबई आणि पुण्याला स्वतंत्र गाडी आणि उत्पन्नवाढीच्या दृष्टीने सर्व एक्‍स्प्रेस गाड्यांना जास्तीचे थांबे, अशा मागण्या आहेत. गुजरातला जोडणारा जळगाव-सूरत या एकेरी मार्गाच्या दुहेरीकरणाची घोषणा झाली. निधीही मंजूर झाला. त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. रावेर, सावदा, निंभोरा भागात पिकणाऱ्या केळ्यांच्या वाहतुकीसाठी वातानुकूलित रॅक, वॅगन नसल्याने केळी उत्पादकांचे नुकसान होते.

विदर्भ - प्रकल्प रखडलेलेच
नागपूर रेल्वे स्थानकाला दिलेल्या "वर्ल्ड क्‍लास' स्थानकाच्या दर्जाला साजेशा सुविधा तेथे नाहीत. नागपूर, बिलासपूर, भुसावळ आणि नांदेड मिळून रेल्वेच्या स्वतंत्र झोनची मागणी रेंगाळली आहे. विदर्भात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड स्थापन झाल्यास स्थानिकांना रोजगार मिळेल. रखडलेल्या प्रकल्पांमध्ये अजनीचे कोच कॉम्प्लेक्‍स, अमरावती-नरखेड मार्ग, छिंदवाडा ब्रॉडगेजचा समावेश आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते शिलान्यास झालेला वर्धा-यवतमाळ-नांदेड या नव्या मार्गाचे काम हललेले नाही.

मराठवाडा - "श्‍वास' कोंडलेला
मराठवाडा रेल्वेचा "श्‍वास' कोंडलेला आहे. रखडलेल्या प्रकल्पांना गती, नव्या रेल्वेमार्गांना मंजुरीसह आर्थिक तरतूद, दुहेरीकरण व विद्युतीकरणाला चालना, रेल्वेसेवांचा विस्तार व प्रवाशांच्या सोयी-सुविधांत वाढ, या मराठवाड्याच्या अपेक्षा आहेत. रखडलेल्या योजनांमध्ये दक्षिण-मध्य रेल्वेमधील नांदेड रेल्वे विभागाचे मध्य रेल्वेत विलीनीकरण, परळी-बीड-नगर मार्ग, अकोला-खंडवा मार्गाचे रुंदीकरण, सिकंदराबाद-मनमाड मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण यांसह स्थानिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरू शकणारे सोलापूर-औरंगाबाद-जळगाव, नांदेड-बिदर, जालना-खामगाव, नांदेड-यवतमाळ-वर्धा हे नवे मार्ग तसेच गेल्या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या जालना-नगरलसोल "डीएमयू'चा समावेश आहे.

नगर-बीड-परळीची केवळ चर्चा
नगर-बीड-परळी (261 किलोमीटर) मार्गाचा 462 कोटी रुपयांचा आराखडा मे 2008 मध्ये मंजूर झाल्यानंतर परळीच्या बाजूने काम सुरू झाले; पण कामाला अद्याप गती आलेली नाही. नगर-पुणे-मुंबई थेट रेल्वेगाडी आणि नगर-दौंड मार्गावरील बेलवंडीपासून पुण्याच्या दिशेने नवा मार्ग तयार करून नगर-पुणे उपनगरी सेवा सुरू करण्याचीही मागणी आहे.

पुणे - मागण्या मागेच
पुणे विभागाची नव्या रेल्वेगाड्यांच्या प्रस्तावाची मागणी निधीच्या अभावाचे कारण देऊन मागे टाकली गेली. महत्त्वाच्या मागण्यांमध्ये पुणे-मुंबई दरम्यान दुपारच्या वेळात अतिजलद गाड्या, औद्योगिकदृष्ट्या भरभराटीला येणाऱ्या कोल्हापूरला सहा तासांत पोचणारी शताब्दी एक्‍स्प्रेस, कोकणासाठी आठवड्यातून किमान दोनदा धावणारी पुणे-रत्नागिरी-सावंतवाडी अतिजलद गाडी, पुणे-सुरत इंटरसिटी एक्‍स्प्रेस आणि पुणे-शिर्डी एक्‍स्प्रेससह चेन्नई, बंगळूर, भुसावळ, अकोला, अमरावती, राजकोट, गुजरातमार्गे जम्मू आणि गुवाहाटीसाठी नव्या गाड्यासह पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरण कर्जत-पनवेल दरम्यान दुहेरी मार्ग तसेच पुणे-नगर, पुणे-नाशिक, कोल्हापूर-सावंतवाडी दरम्यानच्या लोहमार्गांचा समावेश आहे. पुणे स्थानकावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खडकी, लोणावळा किंवा मांजरी येथे स्वतंत्र टर्मिनलची उभारणी आवश्‍यक आहे.

मुख्य प्रवाहापासून रेल्वे दूरच
रेल्वे वाहतूक तुलनेने स्वस्त असूनही साताऱ्यातील बहुतांश प्रवाशांसाठी प्राधान्याचा विषय नाही. औद्योगीकरणामुळे विकसित होणाऱ्या शिरवळ, खंडाळा, लोणंद, फलटण शहरांच्या दृष्टीने लोणंद स्थानक विकसित करावे, अशी मागणी आहे. पुणे-कोल्हापूर लोहमार्ग एकेरी असल्यामुळे साताऱ्याला जाण्यासाठी जलद रेल्वेसुद्धा साडेतीन तास घेतात. दीड ते अडीच तासांत साताऱ्याहून पुण्याला पोचणाऱ्या रेल्वे सुरू झाल्या, तर पुण्याकडे होणारे स्थलांतर कमी होऊ शकेल. कऱ्हाड-चिपळूण मार्गाचे सर्वेक्षणाला हा रखडलेला आणखी एक प्रकल्प आहे.

नाशिक - उपेक्षेचे मॉडेल स्थानक
रेल्वेच्या दृष्टीने नाशिक रोड मॉडेल स्थानक असले तरी येथील सोयी सुविधांबाबतची उपेक्षा बघता नाशिक रोड हे "उपेक्षेचे मॉडेल' आहे. कोलकत्ता-मुंबई-दुरांतो या कायम उशिराने धावणाऱ्या गाडीसाठी नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची पंचवटी एक्‍स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस "साइड ट्रॅक' केली जाते. नाशिक-पुणे मार्गाचा प्रस्ताव गेली 18 वर्षे धूळ खात पडून असताना नाशिक-कल्याण-कर्जत मार्गे पुण्याला रेल्वे सुरू झाली. तिच्यावरचा वाढता ताण लक्षात घेऊनही वेगळ्या पुणे मार्गाचा विचार होत नाही.

solapur pune pravasi sangatana