मालगाडीच्या अपघातामुळे ५६ रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत

18/01/2012 15:10
नाशिक
मध्य रेल्वेच्या नाशिक-मुंबई मार्गावर गुरूवारी सकाळी मालवाहू गाडीचे २० डबे घसरल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक  पूर्णपणे विस्कळीत झाली. दिवसभरात या मार्गावरून धावणाऱ्या जवळपास ५६ रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडून पडले.
काही रेल्वेगाडय़ा रद्द करतानाच रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्यांच्या गाडय़ा मनमाडहून पुणेमार्गे कल्याणकडे वळविल्या. या घडामोडींमुळे प्रवाशांचे हाल झाले. हा रेल्वेमार्ग पूर्ववत होण्यास २४ तासांहून अधिक काळ लागण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.मुंबईकडे कंटेनर घेऊन निघालेली मालगाडी सकाळी सातच्या सुमारास इगतपुरी तालुक्यातील पाडळी-अस्वली दरम्यान अपघातग्रस्त झाली. २० डबे घसरल्याने रुळालगतचे खांब व ओव्हरहेड वायरही उखडली गेली. या मार्गावरील ९०० मीटर रूळ पूर्णपणे उखडला गेला. मालगाडीची चाके निखळून पडली.
अपघाताचे स्वरूप अतिशय बिकट असल्याने आणि हा मार्ग त्वरित पूर्ववत होण्याची शक्यता नसल्याने रेल्वे प्रशासनाने सकाळी सुटणाऱ्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस रद्द केल्या.

solapur pune pravasi sangatana