राखीच्या बंधनाने अपंग जवानांच्या इच्छाशक्तीला मिळाले नवे बळ!

13/08/2011 11:44

पुणे, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी
alt
देशासाठी सीमेवर लढताना कायमचे अपंगत्व आलेल्या जवानांच्या पोलादी हातात राखीचा नाजूक धागा बांधला गेला अन् पाय निकामी झाले असले, तरी या जवानांमध्ये असलेल्या उत्तुंग इच्छाशक्तीला आज पुन्हा नवे बळ मिळाले. खडकी येथील अपंग जवान पुनर्वसन केंद्रात विविध संस्था व शाळांच्या वतीने रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कृतज्ञतापूर्ण सोहळ्याने जवान भारावून गेले.
खडकीच्या या केंद्रातील वातावरण आज काही निराळेच होते. सकाळपासून वेगवेगळ्या संस्था व शाळांमधील मुली जवानांना राख्या बांधण्यासाठी केंद्रात जमा होत होत्या. केंद्रात विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या टाकण्यात आल्या होत्या. ‘व्हील चेअर’वर बसलेल्या जवानांच्या चेहऱ्यावर या सोहळ्यामुळे आनंदाची एक वेगळीच छटा होती. सैनिक मित्र परिवाराच्या वतीने सकाळी केंद्रात सुमारे पन्नास जवानांना राख्या बांधण्यात आल्या. प्रा. संगीता मावळे, प्रा. सविता फर्नाडिस यांच्यासह मॉडर्न महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांना राख्या बांधल्या. त्याचप्रमाणे विविध शाळांतील मुलांनी जवानांना लिहिलेली पत्रेही या वेळी देण्यात आली. संस्थेचे आनंद सराफ यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रम घेण्यात आला. ‘देश आम्हाला विसरलेला नाही, आम्ही दरवर्षी या प्रसंगाची वाट पाहत असतो.’ अशा भावना जवानांनी व्यक्त केल्या.  ‘व्हील चेअर’वर असूनही या जवानांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड स्टेशन येथील कन्या शाळेच्या मुलींनीही या जवानांना राख्या बांधल्या. मुलींनी देशभक्तीपर गीतेही सादर केली. मुख्याध्यापक वसंत दळवी, शिक्षक मनोज मराठे, जयश्री इनामदार, ज्ञानेश्वर भिसे, संगीता मुंढे, सविता थिगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. महाराष्ट्र विद्या मंडळाच्या पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यमातील मुलींनीही जवानांना राख्या बांधल्या. मुख्याध्यापिका वैशाली सपकाळ यांनी संयोजन केले. ऑल सेंट हायस्कूलच्या मुलींनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.


solapur pune pravasi sangatana