रुळावर फसलेल्या ट्रकला "सचखंड'ने चिरडले

07/03/2011 15:21

 

परभणी - परभणी-जालना लोहमार्गावरील पेडगाव रेल्वेस्थानकाजवळ एका मनुष्यविरहित रेल्वे गेटजवळील रेल्वे रुळावर "सचखंड एक्‍स्प्रेस'ने दिलेल्या जोरदार धडकेत एक ट्रक चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही.

पेडगाव रेल्वेस्थानकापासून 600 मीटर अंतरावर मानवत रोडकडे जाणाऱ्या लोहमार्गावर 111 क्रमांकाच्या मनुष्यविरहित रेल्वे गेटवर रविवारी (ता.सहा) दुपारी एक ट्रक (एमएच- 20, एटी- 2041) रेल्वे क्रॉसिंग वेगाने ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. रेल्वे रुळावर ट्रक आल्यानंतर तो ट्रकवरच अडकून पडला. त्या वेळी ट्रकमध्ये केवळ चालकच होता. त्याने ट्रक मोठ्या महत्‌प्रयासाने सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास यश आले नाही. तेवढ्यात सेलूहून सचखंड एक्‍स्प्रेस भरधाव येत असल्याचे ट्रकचालकाने पाहिले. रेल्वे बघताच ट्रकचालकाने घाबरून तेथून धूम ठोकली. सचखंड एक्‍स्प्रेसने रेल्वे क्रॉसिंगवर अडकलेल्या त्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात ट्रक काही फुटांपर्यंत फरपटत गेला. या धडकेत ट्रकचा चक्काचूर झाला. सचखंड एक्‍स्प्रेस काही काळ घटनास्थळी थांबली व पुढे रवाना झाली. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. परभणी रेल्वेस्थानकावर रेल्वे पोलिस कर्मचारी घटनास्थळी तातडीने धावून गेले. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. ट्रकचालकाचे नाव समजू शकले नाही.

 


solapur pune pravasi sangatana