रेल्वे ई-तिकीट; प्रवाशांची लूट

16/09/2011 15:01
सोलापूर - खासगी केंद्रातून रेल्वेचे ई-तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची केंद्रचालकांकडून दिवसाढवळ्या लूट होत असून, प्रत्येक तिकिटामागे नियमापेक्षा 30 ते 40 रुपयांची जादा आकारणी केली जात आहे. केंद्रचालकांच्या मनमानी कारभारामुळे रेल्वे प्रवासी त्रस्त झाले असले तरी रेल्वेच्या आयआरसीटीसी प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.

एसटीची भाडेवाढ प्रचंड झाल्यामुळे आता रेल्वेच्या प्रवाशांत मोठी वाढ झाली आहे. रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रावर सातत्याने गर्दी असते. अर्ज भरून टोकन घेतल्यानंतर सुमारे दोन-दोन तास तिकीट खिडकीवर नंबर येत नाही. रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर येणारा ताण पाहून आणि प्रवाशांची गरज ओळखून रेल्वे प्रशासनाने खासगी आयआरसीटीसी ई-तिकिटींग सेवा उपलब्ध केली आहे. अशी अनेक केंद्रे खासगी लोकांना चालविण्यास दिलेली आहेत. या केंद्रांमुळे रेल्वे तिकीट आरक्षणासाठी लांबून रेल्वे स्थानकावर जावे लागणाऱ्या प्रवाशांचीही चांगलीच सोय झालेली आहे.

परंतु, या खासगी केंद्रचालकांकडून गैरफायदा घेत रेल्वे प्रवाशांची लूट चालविली आहे. ई-तिकीट काढल्यानंतर मिळणाऱ्या तिकिटावर सर्व तपशील सविस्तर दिलेला असतो. तिकिटाची मोजकी रक्‍कम, आयआरसीटीसी सेवाकर, ट्रॅंन्जेक्‍शन कर, सेवाकर अशी मिळून एकूण रक्‍कम दिलेली असते. या व्यतिरिक्‍त आयआरसीटीसीच्या नियमानुसार एजंट चार्ज प्रति तिकीट दहा रुपये असाही स्पष्ट उल्लेख केलेला असतो. वातानुकूलित आरक्षणासाठी प्रति तिकीट 20 रुपये शुल्क आहे. तरीही खासगी केंद्रचालकांकडून ई-तिकीट घेणाऱ्या प्रवाशांकडून 30 ते 40 रुपये जास्तीचे घेतले जातात. यासंदर्भात प्रवाशांनी विचारणा केली असता, आमचा चार्ज असल्याचे सांगितले जाते. ई-तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशाला नियमानुसार 10 ते 20 रुपये शुल्क कपात करून उर्वरित रक्‍कम खासगी केंद्रचालकाने प्रवाशांना परत देणे बंधनकारक आहे. पण काही केंद्रचालक प्रवाशांची फसवणूक करीत असून, ई-तिकीट रद्दच होत नसल्याचे कारण देत आहेत.

अशा प्रकारे प्रवाशांची होणारी लूट थांबवण्यासाठी यापूर्वी रेल्वेच्या वाणिज्य व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी खासगी केंद्रांची अचानक तपासणी करून काहींवर दंडात्मक कारवाईही केली. परंतु, या कारवाईचा फारसा गंभीर परिणाम केंद्रचालकांवर झालेला दिसत नाही. पुन्हा प्रवाशांकडून नियमापेक्षा जास्त रकमेची आकारणी होत आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून प्रवाशांची लूट थांबवणे अपेक्षित आहे.

प्रवाशांनी तक्रार करावी - सुशील गायकवाड
आयआरसीटीसी केंद्रातून ई-तिकीट घेणाऱ्या प्रवाशांकडून जास्त रक्‍कम आकारली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या होत्या. सोलापुरात अचानक तपासणी करून कारवाईही करण्यात आली होती. असे प्रकार घडत असतील तर संबंधित प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी केले आहे. तातडीने तक्रार देण्यासाठी 9766344020 या त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

solapur pune pravasi sangatana