रेल्वे गाड्यांची होणार यांत्रिक स्वच्छता

22/07/2011 15:39

 

मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या उपनगरी लोकल गाड्यांची स्वच्छता करण्यासाठी आता व्हॅक्‍यूम हायप्रेशर जेट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या नव्या यंत्रामुळे गाड्यांची स्वच्छता जलद गतीने होईल व पाण्याचीही 30 टक्के बचत होईल, असा दावा पश्‍चिम रेल्वेच्या वतीने करण्यात आला आहे. या स्वच्छतेसाठी साडेचार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या यंत्राचा शुभारंभ पश्‍चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक आर. एन. वर्मा यांच्या उपस्थितीत आज मुंबई सेंट्रल येथील कारशेडमध्ये करण्यात आला.

रेल्वे गाड्यांची स्वच्छता हाताने केली जाते. या कामात बराच वेळ जातो व मनुष्यबळही अधिक लागते. गाड्यांची म्हणावी तशी स्वच्छताही होत नाही. त्यामुळे रेल्वे गाड्यांच्या साफसफाईचे 4 कोटी 46 लाख रुपयांचे कंत्राट रेल्वेने मेसर्स युरेका फोर्बस या खासगी कंपनीला दोन वर्षांसाठी दिले आहे. ही कंपनी यांत्रिक पद्धतीने गाड्यांची स्वच्छता करणार आहे.
गाड्यांची स्वच्छता दोन टप्प्यांत केली जाईल. पहिल्या टप्प्यात कारशेडमध्ये थांबलेल्या गाडीत झाडू मारण्याचे व दुसऱ्या टप्प्यात गाड्यांची आतून-बाहेरून धुलाई करण्याचे काम केले जाईल. गाड्यांमध्ये चिकटविण्यात आलेले स्टिकर्स, पोस्टर्सही या यंत्राच्या साह्याने काढता येतील. मुंबई सेंट्रल आणि कांदिवलीच्या कारशेडमध्ये गाड्या धुण्याचे काम केले जाणार आहे. दर दहा दिवसांनी गाड्यांची स्वच्छता केली जाणार असून, रोज 90 डब्यांची स्वच्छता या यंत्राच्या माध्यमातून केली जाणार आहे. या क्‍लिनिंग मशीनमध्ये "वेट ऍण्ड ड्राय व्हॅक्‍यूम' हे प्रेशर जेट मशीन, सिंगल डिस्क स्क्रबर आदी उपकरणांचा समावेश आहे. प्रचंड दाबाने पाण्याचा मारा या यंत्राद्वारे केला जात असल्याने पाण्याची बचत होणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

अस्वच्छ गाड्या ही रेल्वे प्रवाशांच्या तक्रारीचे कारण ठरले आहे. यापुढे प्रवाशांच्या सेवेत स्वच्छ गाड्या धावतील, यासाठी रेल्वेचे प्रयत्न असल्याचे श्री. वर्मा यांनी सांगितले.


solapur pune pravasi sangatana