रेल्वे ट्रॅकची साफसफाई पूर्ण

09/06/2011 15:46

 

पावसाळ्यात रेल्वेची वाहतूक विस्कळित होऊ नये, म्हणून हाती घेण्यात आलेले रेल्वे मार्गाच्या देखभालीचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंह यांनी मंगळवारी दिली.
पावसाळ्यात बऱ्याचदा रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. प्रामुख्याने पुणे-मुंबई दरम्यानच्या रेल्वे मार्गावर अशा घटनांची संख्या जास्त असते. पावसाळ्यात रेल्वे वाहतूक ठप्प होऊ नये, म्हणून यंदा रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.

रेल्वेलाइनच्या बाजूने वाहणारे नाले, प्लॅटफॉर्मच्या बाजूला पाणी जाण्यासाठी असणाऱ्या मार्गांची सफाई करण्यात आली आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या आजूबाजूला असणाऱ्या ड्रेनेजमधील गाळ काढण्यात आला आहे. याखेरीज रेल्वे टॅकच्या बाजूला असणाऱ्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. रेल्वेमार्गालगत असणाऱ्या सोसायट्यांमध्ये साठणारे पाणी बऱ्याचदा रेल्वेलाइनवर येते, अशी ठिकाणेही बंद करण्यात आल्याचे सिंह यांनी नमूद केले.

पुणे ते लोणावळा दरम्यान असणाऱ्या झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी सांडपाण्याची लाइन रेल्वे टॅकवर सोडल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्यात त्यापासून रेल्वे मार्गाला धोका संभवतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेतले आहे. लोहमार्गावर अशी ठिकाणे आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत अशी ठिकाणे शोधण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले


solapur pune pravasi sangatana