रेल्वे तिकीट म्हणून "एसएमएस'ही चालेल

20/03/2012 16:00
नवी दिल्ली, ता. 5 - रेल्वे प्रवासासाठी इंटरनेटद्वारे केलेल्या आरक्षणाचा "एसएमएस' इलेक्‍ट्रॉनिक तिकीट (ई-तिकीट) म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आरक्षणानंतर "प्रिंटआउट' बाळगण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. "आयआरसीटीसी'कडून आलेला "एसएमएस' हेच नवे तिकीट असेल. या "एसएमएस'मध्ये बदल केला जात आहे.
"ई-तिकीट'ची छापील प्रत नसल्यास मोबाईल, लॅपटॉप किंवा पामटॉपवर आरक्षित केलेले तिकीट छायाचित्र असलेल्या ओळखपत्रासमवेत वैध मानण्याचे रेल्वेने यापूर्वीच ठरविले होते. आता "आयआरसीटीसी'तर्फे पाठविला जाणारा "एसएमएस'देखील ई-तिकीट म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानुसार प्रवाशाने इंटरनेटवरून तिकीट आरक्षित केल्यानंतर "आयआरसीटीसी'च्या "एसएमएस'मध्ये पीएनआर, रेल्वे क्रमांक, प्रवासाची तारीख, श्रेणी, प्रवाशाचे नाव, कोच व आसन क्रमांक, भाडे असा तिकिटाचा संपूर्ण तपशील असेल. शक्‍य झाल्यास त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नावेही "एसएमएस'मध्ये टाकण्याचा प्रयत्न असेल.
हा तपशील असलेला "एसएमएस' छायाचित्रांकित ओळखपत्रासोबत सादर केल्यास तो इलेक्‍ट्रॉनिक आरक्षण तिकीट म्हणून मानला जाईल, असे रेल्वे मंत्रालयातर्फे कळविण्यात आले आहे. प्रवासादरम्यान आणि प्रवास संपल्यानंतरही ओळखपत्रासोबत संबंधित "एसएमएस' दाखविणे बंधनकारक असेल. मात्र, मोबाईल किंवा लॅपटॉप डिस्चार्ज झाल्यामुळे ओळखपत्र असूनही प्रवासी "एसएमएस' सादर करू शकला नाही तर तिकिटाची प्रत न बाळगल्याचा निकष लावून 50 रुपये दंड आकारला जाईल, असेही रेल्वे मंत्रालयाचे म्हणणे आहे. या "एसएमएस'सोबत निवडणूक ओळखपत्र, पारपत्र (पासपोर्ट), पॅनकार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालयाचे ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे छायाचित्रांकित पासबुक, छायाचित्रांकित क्रेडिट कार्ड, आधार कार्ड यांपैकी एक ओळखपत्र प्रवाशांना सोबत बाळगावे लागणार आहे.

solapur pune pravasi sangatana