रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे जम्बो साईडिगमध्येही माल भिजू लागला

12/06/2010 11:43

 रेल्वे प्रशासनाच्या गलथानपणामुळे जम्बो साईडिगमध्येही माल भिजू लागला
सोलापूर दि.११ - सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून रेल्वेतून आलेला माल उतरवून घेणे व चढविणे यासाठी निर्माण करण्यात आलेल्या जम्बो साईडिगवर कव्हरशेड न केल्यामुळे यावर्षीही गहू व सिमेंट पावसात भिजले. गेल्या वर्षी जुन्या मालधक्क्यावर माल भिजला होता. नव्याने निर्माण केलेल्या जम्बो साईडिगला कव्हरशेड करण्याचे नियोजन असतानाही याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. नियोजनाच्या अभावाने आलेले अपयश हुंडेकऱ्यांच्या माथी मारून त्यांच्यावर चारपट दंडाची कारवाई करण्यात मात्र प्रशासन पटाईत असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.
सोलापूर विभागाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात सुमारे ६० ते ६५ टक्के वाटा मालवाहतुकीतून येतो. दरवर्षीच्या ५०० कोटींच्या उत्पन्नातील सुमारे ३०० कोटींचे उत्पत्न मालवाहतुकीतून (गुडस् ) रेल्वे प्रशासनाला मिळते. रेल्वे स्थानकाजवळील जुन्या माल धक्क्यात एक मालगाडी लावण्याची क्षमता नाही. त्यामुळे माल उतरवून घेण्यासाठी तीन ठिकाणी असलेल्या कव्हरशेडच्या गोदामात व एका उघड्या जागेवर माल उतरवून घेतला जातो. सोलापूर मालधक्क्यावर भारतीय खाद्य निगमचा गहू, खत येतो तर सिमेंटची नियमित वाहतूक असते.
सावकारापेक्षाही जाचक दंड आकारणी
सोलापूरच्या मालधक्क्यावर दर महिन्याला ३५ ते ४५ मालगाडी येतात. एका मालगाडीमध्ये ४२ वॅगनचा समावेश असतो. एका मालगाडीमधून दोन हजार ७०० टन माल येतो. एक मालगाडी उतरवून घेण्यासाठी हुंडेकऱ्यांना नऊ तासाचा कालावधी दिलेला असतो. या दरम्यान सर्व माल उतरवून न घेतल्यास एक तासाला १०० रुपये दंड आकारणी सुरू होते. नव्या नियमानुसार चारपट पध्दतीने ही आकारणी आता ४०० रुपये प्रती तासाला आकारणी सुरू होते. ४२ वॅगनपैकी एक जरी वॅगनमधील माल उतरवून घेण्याचे राहिल्यास सर्व ४२ वॅगनला दंड आकारणी सुरू होते. त्यामुळे एका मालगाडीला १६ हजार ८०० रुपये दंड सुरू होतो.
जम्बो साईडिगमध्येही माल भिजला
जुन्या गुडस् शेडमधील अडचणी लक्षात घेऊन रेल्वेने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच नवीन जम्बो साईडिगची उभारणी केली आहे. त्यामुळे ४० बोगीच्या मालगाडीतून एकाचवेळी दोन हजार ६०० टन माल उतरवून घेता येतो. हे साईडिग बंदिस्त असल्याने गळती, पावसामुळे भिजणे आदी प्रकारे नुकसान होणार नाही, असे नियोजन होते. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक भारतभूषण मुदगल हे डिसेंबर २००९ मध्ये सोलापूरच्या दौऱ्यावर आले असतानाही त्यांनी जम्बो साईडिगचे काम एक महिन्यात पूर्ण होणार असल्याची ग्वाही दिली; मात्र स्थानिक प्रशासनाने मुदगल यांच्या आश्वासनाला केराची टोपली दाखविली. तब्बल सहा महिने झाले व पावसाळा सुरू झाला तरी जम्बो साईडिंगवर कव्हरशेड उभारण्यात आलेले नाही. यापूर्वी गहू, खत आदी माल भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते; मात्र प्रशासनाने हुंडेकऱ्यांना भिजलेला माल उचलण्यास भाग पाडले.
कुंपण व गेटही नाही
जम्बो साईडिगचे काम करीत असताना प्लॅटफार्म व त्यावर लोखंडी शेड उभारण्यात आलेले आहे. नव्याने निर्माण केलेल्या प्लॅटफार्म क्रमांक चार व पाचच्या बाजूला हे जम्बो साईडिग असून, त्याच्या बाजूला लक्ष्मी-विष्णू चाळ व रामवाडीचा काही भाग येतो. त्या बाजूला कुंपण बांधण्यात आलेले नाही तसेच गेटही निर्माण करण्यात आलेले नाही. त्यामुळे 'आओ जाओ घर तुम्हारा' याप्रमाणे कोणीही जम्बो साईडिगवर फिरतात तसेच एका मालगाडीमधून पडलेल्या मालाची चोरी करतात. या ठिकाणी उतरलेल्या मालाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची नाही, असे रेल्वे प्रशासनाने हुंडेकऱ्यांना स्पष्टपणे बजावलेले आहे. त्यामुळे दाद कोठे मागायची असा प्रश्न निर्माण होतो.
गहू, खत व सिमेंटही भिजणार
सोलापूर माल धक्क्यावर आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातून सिमेंट नियमित येते. भारतीय खाद्य निगमचा गहू पंजाब राज्यातून येतो हा गहू उतरवून सोलापूर, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात पाठविण्यात येतो. फ्री सेलची साखर येथील मालधक्क्यावरून रेकमध्ये भरून अन्यत्र पाठविण्यात येते. विदर्भातून खते येतात, ते सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात येतात. सध्या सोलापुरातील गुडस्मध्ये भारतीय खाद्य निगमच्या गव्हाच्या दोन मालगाडी, खताच्या दोन मालगाडी आलेल्या आहेत. तेही पावसात भिजत आहेत. खतांची तर नियमित वाहतूक होते.
फक्त नियोजन केल्यास ऑल इज वेल
प्रवाशांना सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरत असलेले रेल्वे प्रशासन गुडस् सेवेबद्दल बेफिकीर असल्याचे दिसून येते. गुडस्मध्ये दर महिन्याला येणाऱ्या ३५ ते ३६ मालगाड्या एकदम तीन चार एकाच दिवशी न आणता, त्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास तसेच एक किवा दोन दररोज आणल्यास कोणतेही प्रश्न निर्माण होणार नाहीत. प्रशासनाने सुसंवाद साधला व अडचणी जाणून घेतल्यास समस्या येणार नाहीत. तसेच गहू, खत, सिमेंट व साखर याचे नुकसान होणार नाही. रेल्वे प्रशासनाने नियोजन करून आडमुठेपणा सोडून द्यावा, अन्यथा गेल्यावर्षी गुडस्मधील माल न उचलण्याचे आंदोलन केले, त्याच धर्तीवर यावर्षीही करण्याचा इशारा हुंडेकरी व व्यापाऱ्यांनी दिला आहे.

 


solapur pune pravasi sangatana