रेल्वे मालधक्‍क्‍यावर सुविधा न दिल्यास कामकाज बंद करणार

10/05/2011 11:35

जळगाव - रेल्वे मालधक्‍क्‍यावरील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे ट्रक व्यवस्थित चालू शकत नाहीत. तसेच तेथे कोणतीही सुविधा नसल्याने हमालांनाही काम करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वेने मालधक्‍क्‍यावर त्वरित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा 20 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मालधक्का वाहतूक ठेकेदारांनी दिला आहे.

शहरातील पिंप्राळा रस्त्यावर भोईटेनगरनजीक रेल्वेचा मालधक्‍क्‍यावर सुविधांचा अभाव आहे. मालधक्‍क्‍यावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. त्यामुळे चालकाला वाहन चालविणेही शक्‍य होत नाही. तसेच दोन्ही मालधक्‍क्‍यांना जोडणारा रस्ताही अतिशय खराब आहे. रस्त्याची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, असा आरोप ठेकेदार संघटनेने केला आहे.

आश्‍वासनाची पूर्ती नाही
मालधक्‍क्‍यावर सुविधा देण्याबाबत जिल्हाधिकारी, आमदार सुरेशदादा जैन व रेल्वे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. त्यावेळी रेल्वे प्रशासनाने एका महिन्याच्या आत समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, तीन महिने उलटल्यावरही रेल्वे प्रशासन सुविधा देण्याबाबत गप्पच आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.

कामाचा खोळंबा
मालधक्‍क्‍यावर असुविधेमुळे मालवाहतूक करण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे तेथे काम करणेही कठीण झाले असल्याचे संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. याशिवाय हमाल वर्गालाही कोणत्याही सुविधा नाहीत. रेल्वेचे अधिकारी येतात पाहणी करतात व निघून जातात. प्रत्यक्ष कामाला मात्र कधीच सुरवात होत नाही. दोन दिवसांपूर्वीही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ते आले. मात्र, वाहनाच्या खालीही न उतरता त्यांनी पाहणी केली व निघून गेले. काम केव्हा सुरू करणार, याबाबत कोणतीही माहिती त्यांनी दिली नाही. अधिकाऱ्यांनी तातडीने तक्रारीची दखल घेतली नाही, तर मालधक्‍क्‍यावरील काम 20 सप्टेंबरपासून बेमुदत बंद करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.


solapur pune pravasi sangatana