रेल्वेस्थानकावर विजेचा अपव्यय

26/10/2012 13:31
सोलापूर - राज्यात विजेच्या तुटवड्यामुळे भारनियमनाची परिस्थिती असताना सोलापूर रेल्वेस्थानकावरील अनेक कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय मोठ्याप्रमाणात होत असल्याचे चित्र गुरुवारी दिसले.

सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिस वायरलेस, सीटीएस कार्यालय, स्टेशन प्रबंधक, उपस्टेशन प्रबंधक, मुख्य तिकीट निरीक्षक, उपस्टेशन प्रबंधक (वाणिज्य), तिकीट निरीक्षक आणि विश्रांतीकक्ष आदी कार्यालये आहेत. यातील काही कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी नसतानादेखील आज दिवे, पंखे सुरू होते. त्याशिवाय इतर वेळीही हेच चित्र दिसते. महाराष्ट्रात सोलापूरसह अनेक ठिकाणी विजेचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे भारनियमन करण्यात येत आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर मात्र याउलट चित्र आहे. अनेक ठिकाणचे दिवे, पंखे सुरू ठेवून अधिकारी, कर्मचारी निघून जातात. दिवसा विनाकारण सुरू असलेल्या दिव्यांकडे तसेच पंख्यांकडे लक्ष देण्यास मात्र येथे कोणालाच वेळ दिसत नाही. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधकांच्याच कार्यालयातील दिवे आणि पंखेही सतत सुरूच असतात. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारले असता, ""साहेब येणार आहेत. त्यामुळे दिवे आणि पंखे सुरू ठेवण्यात आले आहेत', असे कर्मचारी सांगतात. रेल्वेस्थानकावर होणारा हा विजेचा अपव्यय रोखता आला तर मोठ्याप्रमाणावर विजेची बचत होऊ शकते.

दुसरीकडे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकारही रेल्वे स्थानकावर पाहायला मिळतो. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी बांधण्यात आलेल्या चौकोनी कट्ट्यामधून स्थानकावरील पत्राशेडला आधार देण्यासाठी खांब रोवण्यात आले आहेत. याच खांबांवर स्वीचरमधून विद्युत जोडणी करण्यात आली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर पत्र्यावर पडणारे पाणी फलाटाच्या बाहेर न पडता या खांबांवरून थेट कट्ट्यावर पडते. येथील स्वीचरवर पाणी पडल्याने उच्चदाबाच्या विजेचा झटका लागून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. एकीकडे दिवसभर विनाकारण वीज वाया घालवणारे रेल्वे प्रशासन फलाटावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेची मात्र काळजी घेताना दिसत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

solapur pune pravasi sangatana