रेल्वे आणि प्रवाशांची सुरक्षा हेच 'आरपीएफ' चे कर्तव्य

29/10/2012 13:28
सोलापूर - रेल्वेची आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता हेच "आरपीएफ' चे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय रेल्वे सुरक्षा बल संघटनेचे राष्ट्रीय महासचिव यू. एस. झा यांनी केले. अखिल भारतीय रेल्वे सुरक्षा बल संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. आर. रेड्डी होते. यावेळी व्यासपीठावर मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त अनिल शर्मा, सोलापूर विभागाचे व्यवस्थापक ए. के. प्रसाद, संयुक्त महामंत्री बी. एल. बिश्‍नोई, विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. शर्मा, धरमवीर सिंग आदी उपस्थित होते.

झा म्हणाले, की देशात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ येथून अनेक कारवाया होत आहेत. पण अशा प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न होताना दिसतो. मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर झालेल्या हल्ल्यावेळी आरपीएफ, सीआरपीएफचे जवान शत्रूशी सामना करण्यात कमी पडले. अनेक ठिकाणी रेल्वेवर दरोडे पडतात. याचा प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. आरपीएफ कुठे कमी पडते याचा अभ्यास करा. प्रवाशांच्या आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यात आरपीएफ कुठेही कमी पडता कामा नये. रेल्वे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण असल्याचेही झा म्हणाले. आरपीएफकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता आणि घडणाऱ्या दरोड्यासारख्या घटना यांमध्ये रेल्वे प्रशासनाची मोठी बदनामी होत आहे. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करणे हे रेल्वेचे काम आहे. चार तासांच्या रेल्वे प्रवासातही नागरिकांना भीती वाटत असेल तर यावर गांभीर्याने विचार करावा लागेल, असेही ए. के. प्रसाद यांनी सांगितले. या अधिवेशनावेळी आरपीएफ असोसिएशनचे सोलापूरचे अध्यक्ष विक्रमसिंह चहार, सचिव राजेश मिश्रा आदी उपस्थित होते.

आरपीएफला ऊर्जितावस्था आणायची असेल तर...
आरपीएफला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणायचे असेल तर दारू, गांजा पिणे बंद केले पाहिजे, असे यू. एस. झा यांनी आपल्या भाषणात सांगितले. रेल्वेवर पडलेल्या दरोड्यावेळी काही जवान नागरिकांना दारूच्या नशेत आढळून आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर झा यांचे हे विधान मोठे सूचक होते.

solapur pune pravasi sangatana