रेल्वे प्रवाशांची झोळी रिकामीच

21/04/2012 12:49
सोलापूर - रेल्वेच्या झोळीत भरभरून दान टाकणा-या सोलापूरकरांना मात्र विविध सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. गेल्या 20 वर्षांपासून ही परिस्थिती कायम असून, विकासकामे, सुविधा देण्याकडे दुर्लक्ष  करून रेल्वेने शहरवासीयांची क्रूर चेष्टा केली आहे. रेल्वेमार्ग दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामांना विलंब लागत असल्याने अनेक गाड्यांना फटका बसत आहे. रेल्वेची ही उदासीनता शहराच्या प्रगतीतही अडसर ठरू लागली आहे.

दहा लाख लोकसंख्येच्या या शहरातून दररोज साधारण 40 हजार जण रेल्वेतून प्रवास करतात. शहरात उद्योग थाटण्यासाठी अनेक उद्योजक इच्छुक आहेत. मात्र, रेल्वे सेवेतील त्रुटी आणि विमानसेवा बंद असल्याचा फटका बसत आहे. त्यामुळे तरुणांना रोजगाराच्या संभाव्य संधींपासून वंचित राहावे लागत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून सोलापूरहून हैदराबादसाठी दोन, अजमेर, नागपूरसाठी प्रत्येकी एका गाडीची मागणी केली जात आहे. या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेने आतापर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस सुरू तर झाली, मात्र  चेअरकार नसल्याने प्रवाशाची अडचण झाली आहे. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे जिल्ह्याचे दोन केंद्रीय मंत्री आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून शहर, जिल्ह्यातील महत्त्वाची सत्ताकेंद्रे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच ताब्यात आहेत. तरीही रेल्वेच्या विविध सुविधा शहराला मिळालेल्या नाहीत.

सोलापूर रेल्वे स्थानकावरून दररोज 80 गाड्यांची ये-जा असते. यात मुंबई- नागरकोईल, मुंबई- तिरुपती, सोलापूर-जयपूर, मुंबई - हैदराबाद, मुंबई-कन्याकुमारी, पुणे-हैदराबाद, मुंबई-कन्याकुमारी, मुंबई-चेन्नई, मुंबई-बंगळुरू, म्हैसूर-शिर्डी या प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. लोहमार्ग पोलिस- 60, रेल्वे सुरक्षा दल- 75. आणखी एका प्लॅटूनची मागणी आहे. एका प्लॅटूनमध्ये 110 जवान असतात.

solapur pune pravasi sangatana