रेल्वे प्रवाशांनाही मनमानीचा फटका

03/11/2012 13:26
सातारा - रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका रेल्वे स्थानक तसेच मुख्य बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही मनमानी सहन करावी लागत आहे. क्षेत्र माहुली येथील रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना साताऱ्यात आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसची सुविधा केली आहे. दिवसा तसेच रात्रीही ही सोय होती. रेल्वे येण्याच्या वेळेला या बस स्थानकावर जात असल्यामुळे त्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या प्रवाशांना भाड्यापोटी जास्त भुर्दंड बसत नव्हता. मात्र, सध्या रात्री 10.10 वाजता रेल्वे स्थानकावर शेवटची बस आहे. पूर्वीही तेथे रात्रभर बसची सेवा असायची. त्यामुळे रिक्षाचालकांच्या धंद्यावर परिणाम होत होता. रात्री प्रवाशाला अडवून दोनशे-अडीचशे रुपयांपर्यंत भाडे आकारता यायचे नाही, त्यामुळे त्या काळात रिक्षाचालकांनी बसचे वाहक व चालकांनाच दमदाटी करण्याचा, अडथळा निर्माण करण्याचा फंडा अवलंबला होता. बसला थांबायला जागाच मिळू नये, अशी व्यवस्था केली जायची. चालक-वाहक बाजूला गेले, की एसटीच्या चाकाला खिळे लावण्याचे प्रकार व्हायचे. हे प्रकार वाढत पुढे रेल्वे येण्यापूर्वीच चालकाला बस स्थानकातून हलविण्यासाठी जबरदस्ती केली जायची. याबाबत चालक व वाहक यांनी आगार प्रमुखांकडे तक्रारीही केल्या होत्या. मात्र, त्या दरम्यान रेल्वेचा टपाल वाहतुकीबाबत एसटीशी केलेला करार संपला. रिक्षाचालकांच्या त्रासाला वैतागलेल्या महामंडळाने तो धागा पकडून रात्री दहानंतरची बस सुविधाच बंद केली आहे. त्यामुळे रात्री दहानंतर येणाऱ्या प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिकांची होणारी ही गैरसोय टाळण्यासाठी एसटीने रात्रीची बस सुविधा पुन्हा सुरू करणे आवश्‍यक आहे. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासाचा बंदोबस्त केला पाहिजे.

मुख्य तसेच राजवाडा बस स्थानकावरही क्रमांकाने न थांबणाऱ्या रिक्षाचालकांचा प्रवाशांना त्रास होत आहे. बस स्थानकात दिवसा आणि रात्रीही खुलेआम आत शिरणारे रिक्षाचालक निदर्शनास येतात. क्रमांकाने थांबलेल्या रिक्षापर्यंत प्रवासी पोचण्यापूर्वी ते अडवतात. त्यामुळे क्रमांकाला थांबायचे कशाला, असा प्रश्‍न प्रामाणिक काम करणाऱ्या रिक्षाचालकांना पडतो. बोलायला गेले तर, भांडणाचे मूळ. पोलिसही बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे अधिकृत व प्रामाणिक रिक्षाचालकांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत आहे. नियम डावलणाऱ्या रिक्षाचालकांमुळे एसटीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. खासगी वाहनांना प्रवेश बंद असे लिहिलेले फलकही व्यवस्थित राहत नाहीत. काल सायंकाळी पाचच्या सुमारास स्थानकात बसला अडथळा होईल, अशी रिक्षा लावणाऱ्याला एका बसचालकाने डापरले. त्यावर त्याने दांडक्‍याने मारण्याची तयारी केली असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांकडून परिणामकारक कारवाई होत नाही. त्यामुळेच हे फोफावतेय, असे त्यांचे म्हणणे आहे. वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

रात्री बस पाहिजेच
रात्री दहानंतर सातारा रेल्वे स्थानकावर साधारण चार ते पाच गाड्या येत असतात. लांबचा प्रवास असणारे अनेक नागरिक त्या रेल्वेने येत असतात. रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे बस सुरू असतानाही नागरिकांना जादा भाडे द्यावे लागायचे. टपाल बंद झाल्यामुळे बस बंद केल्याचे अधिकारी सांगत असले, तरी रिक्षाचालकांचा त्रासही त्याला कारणीभूत आहे. मात्र, रात्रीची बस बंद झाल्याने रिक्षाचालकांना रान मोकळे झाले आहे. प्रवाशांना दोनशे ते अडीचशे रुपयांचा भुर्दंड साताऱ्यात यायला सोसावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीचा विचार करून विभाग नियंत्रक अनंत मुंडीवाले (जाधव) यांनी किमान मिनी बस रात्रीच्या वेळी सुरू करणे आवश्‍यक आहे.

'रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकांचा त्रास होतो, ही वस्तुस्थिती होती. मात्र, रेल्वेचे टपाल बंद झाल्याने रात्रीची बस सेवा बंद केली आहे. प्रवाशांची संख्या वाढली, तर विभागीय कार्यालयाच्या मंजुरीनंतर बस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेता येईल. मुख्य बस स्थानकातही आत येणाऱ्या रिक्षाचालकांकडून दमदाटीचे प्रकार होत आहेत. पोलिसांनी अशा रिक्षाचालकांवर कारवाई केली पाहिजे.''
- के. पी. पाटील (आगार व्यवस्थापक, सातारा.)

'मुख्य बस स्थानकावर रात्रीच्या वेळी क्रमांकाने न थांबणाऱ्या रिक्षाचालकांच्या मनमानीच्या तक्रारी आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीच्या वेळी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. रिक्षा स्थानकात जाणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येईल.''
- के. एन. पाटील (सहायक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा.)

solapur pune pravasi sangatana