रेल्वे प्रवासासाठी आजपासून ओळखपत्राची सक्ती

01/12/2012 13:14
कोल्हापूर- रेल्वे तिकिटांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या आरक्षित डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटासोबत त्यांचे ओळखपत्र बंधनकारक केले आहे. उद्यापासून (शनिवार) हा नियम लागू होत आहे. ओळखपत्र नसल्यास दंडात्मक कारवाई होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

रेल्वेच्या आरक्षित डब्यांच्या तिकिटात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, एकाच्या नावावर दुसरा प्रवासी प्रवास करत असल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला. यासाठी उद्यापासून (शनिवार) रेल्वे तिकिटासोबतच मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयाकडून दिलेले विद्यार्थी ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या खातेदाराचे छायाचित्रासह पासबुक, छायाचित्रासह बॅंक क्रेटिड कार्ड, केंद्र आणि राज्य शासनाकडून जारी अनुक्रमांक असलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे.

रेल्वेचे आरक्षण सुविधा ऑनलाईन झाली आहे. तसेच, सार्वजनिक वाहतुकीत भरमसाठ भाडेवाढ झाली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. यासाठी तातडीच्या प्रवासासाठी तिकीट मिळणे अवघड झाले आहे. दिल्ली-कोलकता, चेन्नईत अचानक प्रवास करायचा झाल्यास रेल्वे आरक्षणातील तत्काळ सेवेचा लाभ घ्यावा लागतो. त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. काही वेळेला तत्काळ तिकीट मिळणे अवघड होते. यासाठी काही स्थानिक पातळीवर एजंटांकडूनही जादा दरात तिकीट विक्री केल्याचे चर्चा आहे. यात मूळ तिकीट दरापेक्षा दामदुप्पट अथवा तिपट्ट विक्री होतेच. शिवाय नाव एकाचे आणि प्रवास दुसऱ्याचा असा प्रकारही काही वेळेला घडतो. प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी वेळ व पैसा खर्ची घालावा लागतो. असा दुहेरी त्रास बंद व्हावा व प्रवाशालाच त्याच्याच नावे अधिकृत तिकिटावर प्रवास करता यावा. काही दुर्घटना घडल्यास प्रवाशाची ओळख तत्काळ पटावी. काही समाजकंटकांकडून घातपात होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ही ओळख महत्त्वाची ठरेल.

रेल्वेच्या पॅसेंजरमधून प्रवास करणारे 60 ते 70 टक्के प्रवासी नेहमीचे व सर्वसामान्य वर्गातील असतात, तर उर्वरित आरक्षित डब्यांतून प्रवास करणारे प्रवासी पर्यटक, उद्योग, व्यासायिक, व्यापारी वर्गातील असतात. त्यामुळे त्यांना हा नियम लागू असला तरी ओळखपत्र देणे सहज शक्‍य होणार आहे.

ओळखपत्रे आवश्‍यकच
देशांतर्गत घातपाताचे प्रकार वाढल्याने नामांकित शहरात कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी येणाऱ्या घटकांना निवास करायचा झाल्यास हॉटेल, लॉजिंगचालकांकडून ओळखपत्रांची मागणी केली जाते. एखाद्या व्यक्तीचे ओळखपत्र नसल्यास त्या शहरात निवास करणे अवघड होते. यातच हॉटेल पाठोपाठ रेल्वे प्रशासनाने ओळखपत्र सक्तीचे केल्याने खासगी क्षेत्रातील व्यावसायिक किंवा सामान्य नागरिक प्रत्येकाला ओळखपत्र जवळ बाळगावेच लागणार आहे. अन्यथा प्रवास व निवासदरम्यान पेच निर्माण होईल.

solapur pune pravasi sangatana