रेल्वे माथाडींचे काम बंद दुसऱ्या दिवशी सुरूच

27/07/2012 13:24

कोल्हापूर - रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेने मूलभूत सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी सुरू केलेले काम बंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले.

खासदार राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून कामगारांनी येथे सोयीसुविधा पुरविण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाशी बोलणी करावीत, अशी मागणी केली.
येथील शाहू मार्केट यार्डाच्या मागील बाजूस असलेल्या गुडस आवारात दरवर्षी पावसाळ्यात चिखल होतो. येथे माथाडी कामगारांना काम करणेही मुश्‍कील होते. तसेच स्वच्छतागृह नाही, रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. शेडला पत्रे नसल्याने पाऊस लागतो, अशा विविध गैरसोयी आहेत.

या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून लावून धरली आहे. तरीही रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही.
रेल्वेचे व्यवस्थापक श्री. थॉमस यांनी येथे काल (बुधवारी) भेट देऊन पाहणी केली होती. कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही याच मागण्यांसाठी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवले.

दरम्यान, संघटनेने राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून रेल्वे प्रशासनाला येथे मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याबाबत पाठपुरावा करावा, अशी विनंती केली असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.


solapur pune pravasi sangatana