लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन : कुलभूषण

21/04/2011 14:08

पंढरपूर, दि. ६ (प्रतिनिधी) - विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या सोयीसाठी लातूर-मिरज रेल्वेमार्गावर लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण यांनी दिली. तसेच पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गावरील बंद असलेल्या काही रेल्वेगाड्या सुरू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर-मिरज नव्याने रूंद झालेल्या १३७ कि.मी. रेल्वेमार्गाची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण यांनी पुणे, कोल्हापूर, पंढरपूर असा रेल्वेने दौरा केला. रविवार, ६ मार्च रोजी दु. ३.१५ वा. त्यांचे रेल्वेस्थानकावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या समवेत सोलापूरचे प्रबंधक स्वामीनाथन, वाणिज्य विभागाचे प्रबंधक सुशील गायकवाड उपस्थित होते. सुरुवातीला त्यांनी विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी रेल्वेस्थानकावरील रुक्मिणी उद्यानात वृक्षारोपण केले.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक कुलभूषण म्हणाले की, प्रवाशांच्या सोयीसंबंधी निर्णय झाले पाहिजेत. यादृष्टीने लक्ष घालणे गरजेचे आहे. पंढरपूर-कुर्डूवाडी मार्गावरील बंद करण्यात आलेल्या सहा रेल्वेगाड्यांच्या संबंधाने रविवारी सोलापूर - पुणे प्रवासी संघटनेने त्यांना निवेदन दिले. या मार्गावरील गैरसोय टाळण्यासाठी काही गाड्या लवकरच सुरू कराव्यात तसेच या मार्गावरील बाभुळगाव, मोडनिब, लऊळ आदी ठिकाणी जाणाऱ्या सध्या एकही गाडी नसल्याने हे प्रवासी एस.टी.ने प्रवास करीत आहेत. त्यांच्याही सोयीचा विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे.भाविकांच्या सोयीसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन असल्याचे महाप्रबंधक कुलभूषण यांनी सांगितले


solapur pune pravasi sangatana