लोकलवर खूश; स्टेशनवर नाखूश

31/07/2012 12:48
शिवाजीनगर-लोणावळा लोकलच्या प्रयोगावर प्रवासी खूश असले , तरी दुसरीकडे स्टेशनवरील तोकड्या सोयीसुविधांवर मात्र तीव्र नाराज आहेत.
पुणे स्टेशनवरील लोकलचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोणावळ्याकडे जाणार्या दोन लोकलगाड्या शिवाजीनगरवरून सोडण्याचा निर्णय घेतला , त्यानुसार रविवारपासून हा प्रयोग सुरू झाला आहे. या स्टेशनवरून सकाळी दहा वाजून ५० मिनिटांनी आणि संध्याकाळी सात वाजून ३० मिनिटांनी सुटणार्या लोणावळा लोकल गाडीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी ही लोकलसेवा अधिक फायदेशीर ठरत असल्याचे रेल्वेच्या अधिकार्यांनी सांगितले.

सकाळी दहा वाजून ४० मिनिटांनी तळेगाववरून शिवाजीनगरला येणारी लोकल दहा वाजून ५० मिनिटांनी लोणावळ्याला जात आहे. तळेगाववरून येणार्या लोकलला प्रवाशांची गर्दी चांगली असते. ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येते व तीच गाडी परत लोणावळ्याला जाते. या ठिकाणी चढ-उतार करणार्या प्रवाशांची गर्दी असते. शिवाजीनगर स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्याने प्रवाशांना बाहेर जाताना त्रास होतो. त्यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विचार करण्याची गरज असल्याचे प्रवीण वाघ हा विद्यार्थी म्हणाला.

शिवाजीनगर लोणावळा लोकलमुळे प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली असली , तरी स्टेशनचे मुख्य प्रवेशद्वार आकाराने लहान आहे. लोकल आल्यावर प्रवाशांना बाहेर पडताना अडचण येते. त्यामुळे प्रवेशद्वार मोठे करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत तनय रणदिवे या प्रवाशाने व्यक्त केले.
शिवाजीनगर स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच तिकीट विक्रीची खिडकी आहे. बर्याचदा प्रवाशांची रांग स्टेशनच्या दारापर्यंत आलेली असते. त्यामुळे बाहेर जाणार्या प्रवाशांची अडचण होते. तिकीटविक्रीच्या खिडकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करून मुख्य प्रवेशद्वार वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज असल्याची मागणी अनेक प्रवाशांकडून करण्यात आली.

शिवाजीनगर-लोणावळा लोकलचा प्रयोग सुरू केला असला , तरी दुसर्या बाजूला प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीची बससेवा वेळेवर उपलब्ध होत नाही. स्टेशनच्या बाहेर थांबणार्या रिक्षांसाठी उत्तम व्यवस्था करण्याची गरज असल्याची भावना अनेक प्रवाशांनी व्यक्त केली.

solapur pune pravasi sangatana