शिर्डी-शहापूर, शिर्डी-शिंगणापूर लोहमार्गांसाठी सर्वेक्षण करणार

19/05/2011 17:00

शिर्डी - शिर्डी ते शहापूर व्हाया अकोले आणि शिर्डी ते शिंगणापूर या दोन नियोजित लोहमार्गांच्या सर्वेक्षणाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना रेल्वे राज्यमंत्री के. मुनिअप्पा यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज येथील बैठकीत दिल्या. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पुढाकारातून ही बैठक झाली.

वाकचौरे यांनी शिर्डी रेल्वे स्थानकावरील गैरसोयींकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. पुणतांबे येथील लोहमार्गावरील उड्डाण पुलाचे काम लवकर सुरू करावे, तसेच वरील दोन्ही नियोजित लोहमार्गांचे सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. मुनिअप्पा यांनी या सर्व मागण्यांबाबत सबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. पुणतांबे येथील उड्डाण पुलासबंधी सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पत्रव्यवहार केला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिर्डी ते शहापूर व्हाया अकोले आणि शिर्डी ते शिंगणापूर या दोन नियोजित लोहमार्गांचे सर्वेक्षण करण्याबाबतचे प्रस्ताव तयार करा, अशा सूचना मुनिअप्पा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

कोपरगाव, शिर्डी व श्रीरामपूर या तिन्ही रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करून ही स्थानके मॉडेल स्टेशन म्हणून विकसित केली जाणार आहेत. या कामांच्या पूर्वतयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

श्रीरामपूर रेल्वे स्थानकावरील मालधक्‍क्‍याबाबतच्या अडचणींकडे वाकचौरे यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर श्रीरामपूरचे प्रकाश चित्ते यांनी यासंदर्भातील अडचणी मांडल्या. त्यातून काय मार्ग काढता येईल ते पाहू, असे आश्वासन मुनिअप्पा यांनी दिले. त्यानंतर त्यांनी व खासदार वाकचौरे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत शिर्डी रेल्वे स्थानकाची पाहणी केली. तेथे प्रवाशांसोबतही मंत्र्यांनी काही वेळ चर्चा करून अडचणी समजून घेतल्या.

साई संस्थानला काम देणार
दाक्षिणात्य भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रोटेगाव ते पुणतांबे या नियोजित लोहमार्गाचे काम साई संस्थानला "बीओटी' तत्त्वावर देण्याची तयारी मुनिअप्पा यांनी या वेळी दर्शविली. याबाबत साई संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांच्याशी मोबाईलवरून चर्चाही केली.


solapur pune pravasi sangatana