सोलापुरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

03/06/2011 12:24

सोलापूर - सोलापूर शहर व परिसराला आज वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. रुपाभवानी मंदिराच्या पाठीमागील नाल्यात एकाचा बुडून मृत्यू झाला. त्याचबरोबर शहर व हद्दवाढ भागात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले. अग्निशामक दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करून रात्री उशिरापर्यंत झाडे बाजूला केली. आजच्या पावसाने शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते.

दुपारपर्यंत 39.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. दुपारनंतर मात्र, ढगाळ वातावरणाने उन्हाची तीव्रता कमी झाली. साधारण साडेचारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात शहरातील विविध भागातील रस्ते जलमय झाले. तर हद्दवाढसह शहरातील विविध भागात झाडे पडली. त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत ही झाडे दूर करण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाच्या वतीने सुरू होते. महापालिकेच्या वतीने जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला होता.

दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास रुपाभावनी मंदिराच्या पाठीमागील नाल्यात दत्तात्रय कल्लाप्पा लोखंडे (वय 44, रा. न्यू बुधवार पेठ) यांचा बुडून मृत्यू झाला. पावसाने पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने दत्तात्रय लोखंडे यांचा मृत्यू झाला. अग्निशामक दलाला माहिती मिळताच त्यांनी मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. जोडभावी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

मोदी, केगाव, किसननगर, केशवनगर, शासकीय रुग्णालय वाहनतळ, किनारा हॉटेल समोरील रस्त्यावर, इंदिरा हौसिंग सोसायटी, केशवनगर सदर बझार पोलिस ठाण्याजवळ, रेल्वे स्थानक परिसरातील कुमार चौक आदी ठिकाणी झाडे पडून मोठे नुकसान झाले. शासकीय रुग्णालय येथील झाडांची फांदी कटरने तोडून वाहने बाजूला करण्यात आली. तर कुमार चौकातील झाडाखाली एका रिक्षा व टमटम सापडून नुकसान झाले. किनारा हॉटेलसमोरील रस्त्यांवर झाड पडल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. झाड्यांची फांद्या तोडून रस्ता पूर्ववत करण्यात आला. वादळी वाऱ्यासह पावसाने उद्‌भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशामक दलाची चार पथके व नगरअभियंता विभागाकडील कर्मचारी कार्यरत होते, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे यांनी दिली.

शहरातील दमाणी ब्लड बॅंक, हरिभाई देवकरण प्रशाला, जनरल पोस्ट ऑफीस, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. काही झोपडपट्ट्यांतही पाणी साचल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त अनिल विपत यांनी दिली.

वीजपुरवठा खंडित
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शहरातील विविध भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. शासकीय रुग्णालय परिसरातील विजेच्या तारांवर व विजापूर रस्त्यावरील फीडरवर झाड पडल्याने रात्री उशिरापर्यंत या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अशोक चौक परिसरातीलही वीजपुरवठा खंडित झाला होता.


solapur pune pravasi sangatana