सोलापूरसाठी "थोडी खुशी बहोत गम'

27/02/2013 11:48

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने यंदाच्या अर्थसंकल्पातून नव्या सात गाड्यांची अपेक्षा केली होती. तसेच तीन गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ, पाच गाड्यांच्या पल्ल्याचा विस्तार तसेच 13 गाड्यांच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात यावी असा प्रस्तावही रेल्वे मंत्रालयाला पाठविला होता. परंतु सोलापूरहून मुंबईला जाण्यासाठी सिद्धेश्‍वर एक्‍सप्रेसप्रमाणे एक अतिरिक्त गाडीचा अपवाद वगळला तर सोलापूरच्या वाट्याला तसे काहीच मिळाले नाही. परंतु संपूर्ण सोलापूर विभागाचा विचार केला तर या शिवाय साईनगर शिर्डी - पुरी आणि साईनगर - कालका या आणखी दोन अशा एकूण तीन गाड्या सोलापूर विभागाला मिळाल्या आहेत.

हे मिळाले...
रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईला जाण्यासाठी आणखी एक अतिरिक्त गाडी देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्याचबरोबर गदग - वाडी दरम्यान नवीन मार्ग, पंढरपूर - विजापूर (व्हाया मंगळवेढा) मार्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बागलकोट - यशवंतपूर एक्‍सप्रेसला म्हैसूरपर्यंत, मुंबई सीएसटी - लातूर एक्‍सप्रेसला नांदेडपर्यंत, सोलापूर - यशवंतपूर एक्‍सप्रेसला म्हैसूरपर्यंत तर यशवंतपूर - निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्‍सप्रेस दोन दिवस चंदीगढसाठी सोडण्यात येणार आहे.

अपेक्षाभंग...
सोलापूर - नागपूर एक्‍सप्रेस दररोज, सोलापूर - हैद्रबाद एक्‍सप्रेस, सोलापूर - कोल्हापूर एक्‍सप्रेस दररोज, लातूर - तिरूपती एक्‍सप्रेस दररोज, नांदेड - पंढरपूर - कोल्हापूर एक्‍सप्रेस आठवड्यातून तीन दिवस, सोलापूर - जयपूर (व्हाया साईनगर शिर्डी) साप्ताहिक एक्‍सप्रेस, आठवड्यातून तीन दिवस सोलापूर - गोवा एक्‍सप्रेस अशा सात नव्या गाड्यांची मागणी सोलापूर विभागाने केली होती. मुंबई सीएसटी - पंढरपूर फास्ट पॅसेंजर आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या गाडीला दररोज करणे, मुंबई सीएसटी - विजापूर फास्ट पॅसेंजर आठवड्यातून चार दिवस धावणारी गाडी दररोज सोडणे तसेच सोलापूर - यशवंतपूर या आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या गाडीला दररोज करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु या मागण्यांची पूर्तता झालेली नाही.


solapur pune pravasi sangatana